नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद प्रश्नोत्तरे )

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना खुल्या बाजारातून वीस हजार कोटीचे कर्ज उभारणीसाठी अनुमती देण्याची केंद्राकडे मागणी - दिपक केसरकर

नागूपर, दि. 18 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 34 हजार 22 कोटी इतका निधी तातडीने द्यावयाचा असून खुल्या बाजारातून 20 हजार कोटीचे कर्ज उभारणीस अनुमती देण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आल्याचे वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य आनंदराव पाटील यांनी राज्यात कर्जमाफी जाहीर केल्यामुळे होणारी आर्थिक तूट दूर करण्याबाबत. केलेल्या उपाय योजनांर्गत प्रश्न विचारला होता. त्यावेळी केसरकर बोलत होते. केसरकर पुढे
म्हणाले राज्यशासनाने अर्थसंकल्पित केलेला महसूल व खर्च याचे योग्य नियोजन करण्यासाठी मासिक निधी विवरणपत्र तयार करण्यात येते. त्यानुसार जमा होणाऱ्या निधी नुसार मासिक खर्चाचा अंदाज तयार करण्यात येतो. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मार्च मध्ये राज्यशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.

केंद्रशासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्याकरिता शासनाने के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती गठित केली असून या समितीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध प्रकल्पांचे सुरु असलेल्या कामासाठी आर्थिक कमतरता भासणार नाही. त्यासाठी आर्थिक नियोजन केले असल्याचे शेवटी
केसरकर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनिल तटकरे, जयंत पाटील, संजय दत्त, हुस्नबानु खलिफे यांनी सहभाग घेतला.

0000

रायगड जिल्ह्याच्या 243 कोटीच्या पर्यटन आराखड्याला लवकरच मंजूरी -जयकुमार रावल


रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी 243 कोटींच्या विकास आराखड्याला लवकरच मंजूरी देणार असल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सदस्य जयंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना विधानपरिषदेत सांगितले.

रावल पुढे म्हणाले रायगड जिल्ह्यातील 59 गावांचा पर्यटन विकासाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने 243 कोटींची विविध कामे केली जाणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना
मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 लाख रु.वितरित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला पर्यटन आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार एकूण 12 जिल्ह्यांचे आराखडे अंतीम
मंजूरीसाठी सरकारकडे आहेत. रायगड किल्ल्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी रायगड किल्ला प्राधिकरण स्थापित करण्यात येणार असल्याचे रावल यांनी शेवटी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार सदस्य सर्वश्री.सुनिल तटकरे, प्रविण दरेकर यांनी भाग घेतला.

0000

अनाथ मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल - पंकजा मुंडे

पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या बाल सुधारगृहात झालेल्या अल्पवयीन अनाथ मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल संबंधित कर्मचा-यावर गुन्हे दाखल केल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य ॲङ जयदेव गायकवाड यांनी लैंगिक शोषणाबद्दल प्रश्न विचारला होता. मुंडे म्हणाल्या लैंगिक शोषन प्रकरणी विभागीय उपआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठन करण्यात आली
होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु केली असून काही कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. याप्रकरणात अडकलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात येणार आहे.

0000

देवनार सिंचन प्रकल्पाच्या आराखड्यास मान्यता -गिरीष महाजन

येवला तालुक्यातील देवनार सिंचन प्रकल्पाच्या सर्वसाधारण आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. असे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सदस्य हेमंत टकले यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात विधानपरिषदेत सांगितले.


महाजन पुढे म्हणाले या सिंचन प्रकल्पाच्या अंदाजपत्रकासाठी क्षेत्रियस्तरावर आवश्यक प्राथमिक सर्वेक्षण व अन्वेषन पुर्ण झाले आहे. बुडित क्षेत्रातील वन जमीन संपादनासाठी आवश्यक संयुक्त मोजणी पुर्ण करण्यात आली आहे.

0000

रोहयोच्या कामातील गैरव्यवहाराबद्दल ग्रामरोजगार सेवक निलंबित -जयकुमार रावल


हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट नावे टाकुन मजूरी घेतल्याबद्दल ग्रामरोजगार सेवकास निलंबित करण्यात आल्याचे रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी सदस्य रामराव वडकुते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले.

या रोजगार हमी घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली असता काही प्रकरणात नियमबाह्य मजूरी प्रदान केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार ग्रामरोजगार सेवक हे दोषी आढळून आले व त्यांच्याकडून अतिप्रदानाची 962
रु. इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. गरज वाटल्यास उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल. असे रावल यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, अमरसिंह पंडीत यांनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget