नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा लक्षवेधी )

औरंगाबाद छावणी गॅस्ट्रो उद्रेक प्रकरणी जाणिवपूर्वक हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करु - मुख्यमंत्री

नागपूर, दि. 13 : औरंगाबाद छावणी परिसरातील जलवाहिनी जुनी असून या भागातील जलवाहिनीवरील गळतीच्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आले आहेत. या परिसरात नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्‌भवलेला गॅस्ट्रो उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणी जाणिवपूर्वक हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

या प्रश्नी सदस्य सर्वश्री सरदार तारासिंह, इम्तियाज जलील, दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगाबाद छावणी परिसरातील भूमीगत
जलवाहिनी 40 वर्षे जुनी असून या भागात गळती आहे हे लक्षात आल्यानंतर तेथे नवीन पाईप टाकून 22 नोव्हेंबरपासून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

विविध विभागाच्या माध्यमातून या परिसरात उद्‌भवलेला गॅस्ट्रो उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी छावणी मंडळाकडून उपाययोजना करण्यात आली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच सहकारी दूध संघांचे प्रश्नही सोडवू - मुख्यमंत्री
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि त्याच वेळी सहकारी दूध उत्पादक संघही टिकले पाहिजेत यादृष्टीने हिवाळी अधिवेशन काळातच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत या विषयावरील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आमदार सर्वश्री सुनिल शिंदे, विजय वडेट्टीवार, नसीम खान, अमीत देशमुख, अमीन पटेल, सुनिल केदार आदींनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 27 रू. इतका दर सहकारी दूध संस्थांनी द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. सहकारी दूध संस्थांनी इतका दर देण्यास असमर्थता दर्शविली असून अनेक सहकारी संस्था सध्या हा दर देत नाहीत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सहकारी दूध संस्थांनी त्यांच्या प्रशासकीय व इतर खर्चावर नियंत्रण न आणता शेतकऱ्याला दुधासाठी मिळणाऱ्या दुधावर नियंत्रण आणणे हे अन्यायकारक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत चांगला दर मिळणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी सहकारी दूध संस्थाही अडचणीत येणार नाही याबाबत शासन निश्चितच योग्य कार्यवाही करेल, असे त्यांनी सांगितले.

पदूम मंत्री महादेव जानकर म्हणाले की, सहकारी दूध संघांना सध्याच्या दूध दरासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी पदूम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. पदूम राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, शासकीय, सहकारी व खाजगी दूध क्षेत्रामध्ये एकसुत्रता यावी तसेच दरवर्षी दुधाचा पुष्टकाळ व दूध भुकटीच्या दरातील चढ-उतारामुळे दुधाच्या भावामध्ये होणाऱ्या तफावतीबाबत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शुगर प्राईज कंट्रोल ॲक्टच्या धर्तीवर 70:30 या सुत्राप्रमाणे दुधाचे दर शेतकऱ्यास मिळावे यासाठी कायदा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन
असून त्यावर कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

कुर्ला डेअरीचे खाजगीकरण करण्याचा कुठलाही प्रस्ताव विचारात नसल्याचेही राज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, सुनिल
केदार, सत्यजीत पाटील, सुनिल प्रभू यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget