सायबर सुरक्षा - सावधानतेची अपेक्षा


             सायबर सुरक्षा ही काळाची गरज असून त्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. यात तज्ज्ञांमार्फत वेगवेगळे सॉफ्टवेअर निर्माण करुन त्याद्वारे सुरक्षा देण्याची जबाबदारी विविध कंपन्या पार पाडत आहेत. असे असले तरी याचा वापर करणाऱ्या नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. आपण असे पाहतो की, अन्न, वस्त्र आणि निवारा याच्या जोडीने माहिती तंत्रज्ञानाची गरज आहे. म्हणूनच अगदी वैयक्तीक पातळीवर सायबर सुरक्षेसाठी जनजागृती होऊन त्यांच्याकडून सायबर सुरक्षेबाबत सावधनेची आवश्यकता वाढत आहे.
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र उपक्रमांतर्गत राज्याच्या सायबर सेलच्या वतीने 'सायबर सुरक्षा' या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा मंत्रालयात घेण्यात आली. त्यासंदर्भातील हा लेख..


महाराष्ट्र पोलीसांच्या रेझिंग डे निमित्त महाराष्ट्र सायबरच्या वतीने सायबर सुरक्षा विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आर्थिक व्यवहारातील सायबर सुरक्षा विषयावर माहिती देण्यात आली. कार्यशाळेत या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी अतिशय सोप्या शब्दांत महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन करताना सांगितले की, सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे आज आवश्यक आहे. याबाबत सतर्क राहून सावधानता बाळगावी, नवीन पिढी ही माहिती तंत्रज्ञानाच्या खूप जवळ आहे, सायबर सुरक्षेबाबत योग्य ज्ञान, बाळगावयाची सावधानता, माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हे खूप महत्वाचे आहे. त्यासाठीच पोलीस रेझिंग डे च्या निमित्ताने सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. अनोळखी ई-मेल्स उघडू नयेत, वायरस असणाऱ्या पेनड्राईव्ह अथवा इतर उपकरणांचा वापर टाळावा व त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही सतर्क राहून अधिक सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

सायबर गुन्ह्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य हे सजग असून संपूर्ण राज्यात सायबर सेल व सायबर ठाणे निर्माण करण्यात आपले राज्य देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. भविष्यातील सायबरचे वाढते प्रमाण आणि आव्हान लक्षात घेता आपण आणखी सक्षम होत आहोत. शासन आपले प्रयत्न करित आहेत त्याजोडीला नागरिकांची साथ मिळायला हवी. भारतात सायबरबाबत विचार केला असता असे लक्षात येईल, सक्रिय फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 20 कोटींच्या आसपास आहे. त्यात दररोज लाखोंची भर पडत आहे. आणि फेसबुकपेक्षा वॉट्सॲपचा वापर करणारे अधिक आहेत. त्यामुळे उपरोक्त बाबतीत आपण जागरुक असणे आवश्यक आहे. कारण सध्याच्या कॅशलेसच्या काळात खुप व्यवहार ऑनलाईन होत आहेत. याबाबत प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे.

अधिकची काळजी

यासंदर्भात आयसीआयसीआय दक्षता विभागाचे उपमहाव्यवस्थापक ग्यान बराह व विभागीय व्यवस्थापक उमंग शहा तसेच व्यवस्थापक शेखर शिंदे यांनी सायबर चोरीपासून वाचण्यासाठी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही बँक अथवा वित्तीय संस्था ईमेलद्वारे वैयक्तिक माहिती मागवित नाही. त्यामुळे लिंक पाठवून माहिती मागणाऱ्या ईमेलपासून सावध रहावे याबाबत सोप्या शब्दात माहिती दिली. यात प्रामुख्याने त्यांनी सांगितले की, सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहाराकडे लोकांचा कल वाढला आहे. वस्तू मागविणे, विविध सेवांचे शुल्क अदा करणे, पैसे ट्रान्सफर करणे आदी विविध कारणांसाठी ऑनलाईनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात सायबर चोऱ्यांचे व फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी बँकाही मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगतात. परंतु, ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना एटीएम कार्डवरील माहिती व त्याचा पासवर्ड कोणाला न देणे, फिशिंग ईमेलवरून मागविलेली माहिती न देणे, लॉटरी किंवा अर्ज न करता नोकरी देणारे ईमेल यापासून दूर राहणे आदी काळजी घेऊन सुरक्षित व्यवहार करावेत.

ईमेलचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला अशा प्रकारचा ईमेल एकदा तरी आलेला आहेच. तसेच प्रत्येक मोबाईल धारकाला असे संदेश आलेले आहेत. तेव्हा अगदी प्रत्येकासाठीच ही बाब महत्वाची आहे. आपणही आपल्या घरी गेल्यावर आई वडील वा जेष्ठ मंडळींना आणि आपल्या पाल्यांना याची कल्पना देऊन त्यांना जागृत करायला हवे. जसेच अशा प्रकारचे ईमेल, मेसेज आले असल्यास त्याबाबत किमान एकदा तरी सर्वा समक्ष चर्चा करुन सावधानतेचा इशारा दिला पाहिजे. शासन, पोलिस याबाबत सतर्क आहेच, आपणही वैयक्तीकरित्या किमान दहा जणांना सतर्क केले तर मोठ्या प्रमाणात जागृती होऊन यासंदर्भात सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ शकते.

सध्या मोबाईलवरूनही आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. बँकांमध्ये मोबाईल क्रमांक जोडले गेल्यामुळे कोणत्याही तिऱ्हाईताला अथवा अज्ञात व्यक्तीला वन टाईम पासवर्ड, एटीएम पिन, किंवा मोबाईलवरून विचारण्यात आलेली माहिती देण्याचे टाळावे. सोशल मिडियातील माहितीचा वापर करून तुमची ओळख, माहिती चोरण्याचे (आयडेन्टिटी थेफ्ट) प्रकार होत आहेत. त्यामुळे फेसबुक सारख्या सोशल मिडियावर माहिती देतानाही काळजी घ्यावी, असे श्री. बराह यांनी यावेळी सांगितले.

ऑनलाईन खरेदी , एटीएम मधून पैसे काढणे तसेच ऑनलाईन आर्थिक व्यवहार, ईमेल, मेसेजद्वारे माहिती मागविणे, बँकेचे विविध व्यवहार, सोशल मिडियाचा वापर अशा किती तरी दैनंदिन उपक्रम आपण दिवसभर करित असतो. ही आपली मुलभूत गरज झाली असे म्हटले तरी वावगे ठरत नाही. त्यामुळे या सायबरबाबत वैयक्तीक सावधानतेचा विचार प्रत्येकाला करावाच लागेल. महाराष्ट्र सायबरचे पोलिस अधीक्षक बालसिंग राजपूत, पोलिस निरिक्षक लक्ष्मण कांबळे, सहायक पोलिस निरिक्षक प्रसाद जोशी, पोलिस हवालदार नवनाथ देवगुडे, विवेक सावंत या पथकाने अशा जनजागृती कार्यशाळेसाठी पुढाकार घेतला असून अशा कार्यशाळा जिल्हास्तरावरही आयोजित करण्यात येत आहेत. याचा निश्चितच चांगला परिणाम होऊन समाजात सायबर विषयक जनजागृती होऊन सायबर गुन्हेगारीस आळा बसेल असे वाटते.

डॉ.राजू पाटोदकर (9892108365)

(लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे वरिष्ठ सहायक संचालक आहेत.)

ई-मेल – patodkar@yahoo.co.in
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget