कडकडीत बंद : राज्यभरात 'बंद' ला चांगला प्रतिसाद

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला 'महाराष्ट्र बंद' ला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कडकडीत बंद होता. 

दरम्यान, १० तासांनी हा बंद मागे घेण्यात आला. याबाबत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'बंद' मागे घेण्याची घोषणा मुंबईत सांयकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

आता मुंबईतल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरच्या लोकल्स सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर वेस्टर्न एक्सप्रेसवेवरची अडवून धरलेली वाहतूकही खुली झाली आहे. इस्टर्न हायवेवरची वाहतूकही हळूहळू सुरळीत होत आहे. काही काळासाठी विस्कळीत झालेली मेट्रो वाहतूकही सुरळीत झाली आहे.

दरम्यान, आज ‘महाराष्ट्र बंद’मुळे एसी लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र बंदमुळे ज्या विद्यार्थ्यांना आज मुंबई विद्यापीठाची परीक्षा देता आली नाही, त्यांची परीक्षा नंतर होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश कांबळे यांनी दिली आहे, असे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे सरचिटणीस सुशील महाडिक आणि कार्याध्यक्ष संदीप केदारे यांनी सांगितले.

सेंट झेव्हियर्स कॉलेजची अकरावीची कला, विज्ञान शाखेची आजची परीक्षा रद्द, आजच्या पेपरची पुढील तारीख लवकरच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात सुरु असलेली शासकीय कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा (जीसीसी-टीबीसी) रद्द करण्यात आली असून, आजची परीक्षा रविवारी 7 जानेवारीला होणार आहे.
महाराष्ट्र बंद

गोवंडी आणि जुईनगर येथे रेलरोको केले गेले. कांजुरमार्ग येथे दोन वेळा रेल रोको करण्यात आले. घाटकोपरच्या रमाबाईनगर इथे आंदोलक रस्त्यावर उतरून त्यांनी इस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम केला. तसेच घाटकोपर मेट्रो स्थानकात ट्रॅकवर उतरुन आंदोलनकर्त्यांनी मेट्रो अडवली.

विरार स्टेशनवर आंदोलकांनी रेल्वे अडवली. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने बोरीवलीजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कोंडी झाली होती. पश्चिम रेल्वेच्या दादर, एल्फिस्टन, गोरेगाव आणि मालाड स्टेशनवर आंदोलन केले गेले. सायन-पनवेल हायवेवर कळंबोली इथे रास्ता रोको केला गेला. त्यामुळे दोन्ही मार्गावर वाहतूक खोळंबली होती.

वरळी नाक्यावर आंदोलनकर्त्यांमुळे येथील वाहतूक बंद झाली होती. दादर पूर्वेकडचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत रस्ता बंद केला होता. दादर, नायगाव परिसरातील दुकाने ही बंद होती.

ठाणे स्टेशनजवळ ट्रॅकवर उतरुन आंदोलकांनी गाड्या अडवल्या होत्या. विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ रेलरोको करण्यात आले होते. उल्हासनगरच्या दिशेने जाणारी लोकल ही अडवली गेली. नालासोपारा स्टेशनवर ट्रॅकवर उतरुन आंदोलन करण्यात आल्याने येथील वाहतूक परिणाम झाला. विरार आणि गोरेगाव स्टेशनवरच्या ट्रॅकवरुन आंदोलकांना हटवून रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली असली तरी वाहतूक उशिराने सुरु झाली. पालघरमध्ये कडकडीत बंद होता.

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर वाहतूक रोखली गेल्याने दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग आणि चिपळूण-कराड मार्ग रोखला होता. तसेच बहादूर शेख नाक्यावर कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. नागपुरात शताब्दी चौक आणि जयताळा परिसरात रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला गेला. पुण्यातील औंध भागात रास्ता रोको गेला. बेळगावहून महाराष्ट्रातील शहरांमध्ये जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्या होत्या. बुलडाणा येथे एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. अकोल्यात सर्व शाळा, महाविद्यालयं पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. बस सेवा ही बंद ठेवण्यात आलेली होती. सांगली डेपोमधून ही एसटी बस सोडण्यात आल्या नाहीत. औरंगाबादमध्ये कड़कड़ित बंद होता. इंटरनेट सेवा आणि एसटी महामंडळाची बस वाहतूकही बंद होती. येथे पोलीस बंदोबस्त ही कडक ठेवण्यात आलेला होता. 3000 हजार पोलिसांसोबत राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या होत्या. पुणे शहरात दुकाने आणि मॉल बंद होते तर बहुतांश शाळांना ही सुट्टी देण्यात आलेली होती. रस्त्यावर वाहतूकही कमी होती. पंढरपूरमध्ये एसटी सेवा बंद ठेवण्यात आलेली होती. वाशिममध्ये सुरक्षेच्या कारणामुळे शाळा, बाजारपेठ, एसी बस सेवा बंद ठेवण्यात आल्या. बीड शहरातील बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

अहमदनगरला जिल्ह्यातील अकरा एसटी आगाराची वाहतूक बंद, श्रीरामपूर, जामखेड, पाथर्डी, तारकपूर, श्रीगोंदासह सर्व आगारातील एसटी वाहतूक ठप्प होती. अमरावतीमध्ये काही शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील खोपोली, माणगाव , कर्जत, पेण, उरण इथे बंदाला चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिक येथे सटाणा बस डेपोने सर्व बस बंद ठेवल्या होत्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget