वाहतूक परवान्यातून बांबू देशभर मुक्त

मुंबई (४ जानेवारी ) : महाराष्ट्रात बांबू वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केल्यानंतर आता देशातही बांबू ला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आल्याने बांबू ची वाहतूक आणि त्यापासूनची उत्पादने या प्रक्रियेला गती येईल. महाराष्ट्राचा हा निर्णय देशपातळीवर स्वीकारल्या गेल्याचा आनंद असल्याचे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औद्योगिक उत्पादनातील बांबूचा वापर वाढवण्यावर आपण भविष्यात भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात बांबू बोर्डाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह बांबू बोर्डाचे सदस्य व वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, वन आणि वनेतर जमीनीवर उत्तम दर्जाच्या बांबूची लागवड मोठ्याप्रमाणात वाढावी यासाठी प्रयत्न केले जावेत. बांबू हे बहुउपयोगी गवत असून यात स्वंयरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. बांबू पल्पपासून कागदनिर्मिती, वस्त्र निर्मिती, बांबू चटई, बांबू पासून हस्तकौशल्याच्या वस्तू, बांबूचे घर, बांबूपासून तयार करण्यात आलेल्या गृहउपयोगी वस्तू आणि इतर औद्योगिक उत्पादने यात प्रचंड रोजगार संधी दडलेल्या आहेत हे लक्षात घेऊन यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान जे सहजतेने लोकांना उपलब्ध होऊ शकेल त्याचा स्वीकार केला जावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

बांबूपासून उर्जा निर्मिती हा एक महत्वाचा प्रयोग अलिकडच्या काळात समोर येत आहे. त्यादृष्टीने उत्तम आणि दर्जेदार बांबूची लागवड राज्यात होणे, वन आणि वनेतर जमिनीवर बांबू लागवड वाढणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे शास्त्रोक्त प्रशिक्षण, बांबूचे भरघोस उत्पन्न देणाऱ्या प्रजाती, कमी दिवसात उत्पन्न देणाऱ्या प्रजाती, याबाबत बांबू विकास मंडळाने मार्गदर्शन करावे, आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. उद्योगाकरिता लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करतांना मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधला जावा, त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली जावी, यासाठी ही बांबू मंडळाने भरीव प्रयत्न करणे अगत्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्यावतीने आज बैठकीत ते करत असलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले.आतापर्यंत २०९ लोकांना मंडळाने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले असून यामध्ये फर्निचर तयार करणे, बांबू टर्निंग आणि बास्केट्री याचा समावेश असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. केंद्रात २ वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन बांबू टॅक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून यास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे. महिला बचतगटांना बांबूपासून बास्केट बनवणे, कचराकुंडी बनवणे, चटई बनवणे, पंखे, पानदान, लॅम्प, शेड बनवणे याचे प्रशिक्षण या केंद्रातर्फे दिले जात आहे. त्यातून महिला बचतगटातील स्त्रियांची आर्थिक सक्षमता होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्यात बांबू उद्योगाला चालना मिळण्यासाठी आणि बांबू वस्तूला जागतिक बाजारपेठ उपलब्ध वहवी यासाठी ५ जानेवारी २०१७ रोजी टाटा ट्रस्ट आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

वनपर्यटनातून रोजगार संधीचा विकास

याच बैठकीत ताडोबा पर्यटन विकास आराखड्यावरही सविस्तर चर्चा झाली. ताडोबामध्ये महिनानिहाय गेल्यावर्षी किती पर्यटक आले, किती गाड्या आत सोडल्या, त्यापासून किती उत्पन्न मिळाले याची माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी असे सांगून मुनगंटीवार यांनी गाईडना प्रशिक्षण देणे, त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये एक समानता असणे यासारख्या गोष्टीही खुप महत्वाच्या आहेत, त्याकडे लक्ष दिले जावे अशा सूचना यावेळी केल्या. वनपर्यटनातून स्थानिकांना रोजगार आणि त्यातून सक्षमीकरण या विषयाच्या अनुषंगाने बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget