ओटीपी, वैयक्तिक माहिती देताय... सावधान.. सायबर चोरी होऊ शकते

ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगावी - महाराष्ट्र सायबरच्या कार्यशाळेत तज्ज्ञांचे आवाहन

मुंबई ( ६ जानेवारी ) : सायबर चोरीपासून वाचण्यासाठी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही बँक अथ वित्तीय संस्था ईमेलद्वारे वैयक्तिक माहिती मागवित नाही. त्यामुळे लिंक पाठवून माहिती मागणाऱ्या ईमेलपासून सावध रहावे, असा सल्ला आयसीआयसीआयचे दक्षता विभागीतील उपमहाव्यवस्थापक ग्यान बराह व विभागीय व्यवस्थापक उमंग शहा, व्यवस्थापक शेखर शिंदे यांनी दिला.

महाराष्ट्र पोलीसांच्या रेझिंग डे निमित्त महाराष्ट्र सायबरच्या वतीने सायबर सुरक्षा विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आर्थिक व्यवहारातील सायबर सुरक्षा विषयावर बराह व शहा यांनी माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

ऑनलाईन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, हे सांगून बराह म्हणाले की, सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहाराकडे लोकांचा कल वाढला आहे. वस्तू मागविणे, विविध सेवांचे शुल्क अदा करणे, पैसे ट्रान्सफर करणे आदी विविध कारणांसाठी ऑनलाईनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात सायबर चोऱ्यांचे व फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी बँकाही मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगतात. परंतु, ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना एटीएम कार्डवरील माहिती व त्याचा पासवर्ड कोणाला न देणे, फिशिंग ईमेलवरून मागविलेली माहिती न देणे, लॉटरी किंवा अर्ज न करता नोकरी देणारे ईमेल यापासून दूर राहणे आदी काळजी घेऊन सुरक्षित व्यवहार करावेत.

सध्या मोबाईलवरूनही आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. बँकांमध्ये मोबाईल क्रमांक जोडले गेल्यामुळे कोणत्याही तिऱ्हाईताला वन टाईम पासवर्ड, एटीएम पिन, किंवा मोबाईलवरून विचारण्यात आलेली माहिती देण्याचे टाळावेत. सोशल मिडियातील माहितीचा वापर करून तुमची ओळख चोरण्याचे (आयडेन्टिटीथेफ्ट) प्रकार होत आहेत. त्यामुळे फेसबुक सारख्या सोशल मिडियावर माहिती देतानाही काळजी घ्यावी, असेही बराह यांनी यावेळी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, कॉन्स्टेबल नवनाथ देवगुडे, विवेक सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget