अग्निसुरक्षा अंमलबजावणीसाठी उपहारगृह संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई ( ८ जानेवारी ) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपहारगृहांमध्ये अग्निसुरक्षेशी संबंधित नियमांचे, तसेच आरोग्य व इमारत विषयक नियमांचे परिपूर्ण पालन केले जाऊन उपहारगृहे ही अधिकाधिक सुरक्षित व अधिक चांगल्या दर्जाची व्हावीत, या उद्देशाने महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज सायंकाळी 'आहार', 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' आणि 'हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया' या संघटनांची विशेष बैठक महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान अग्निसुरक्षा, आरोग्य व इमारतीबाबत असणा-या विविध नियमांचे पालन करणा-यांनाच या संघटनांनी सदस्यत्व द्यावे, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी मांडली. या सूचनेचे स्वागत करित उपस्थित संघटनांच्या पदाधिका-यांनी या सूचनेचा स्वीकार केला आहे.

या बैठकीदरम्यान संघटनांच्या प्रतिनिधींशी उपहारगृहांशी संबंधित विविध बाबींवर चर्चा झाली. यामध्ये अग्निसुरक्षा, आरोग्य व इमारतीच्या अनुषंगाने असणा-या संबंधित नियमांच्या पालनाबाबत संघटनेच्या स्तरावर देखील एक यंत्रणा विकसित करावी आणि या यंत्रणेमार्फत अग्निसुरक्षा विषयक प्रतिबंधात्मक तपासणी नियमितपणे करावी. त्याचबरोबर संघटनेचे जे सदस्य हे नियम पाळणार नाहीत, त्यांना सदस्य करुन घेऊ नये, किंवा जे सदस्य असतील, त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी एक सूचना महापालिका आयुक्तांनी मांडली. उपहारगृहांच्या तिन्ही संघटनांनी देखील यानुसार आवश्यक ते सहकार्य करण्याचे मान्य करित सदर सूचनेचा स्वीकार करुन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांना बैठकीच्या दरम्यान दिले.

आज संध्याकाळी महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या या विशेष बैठकीला सदर तिन्ही संघटनांचे पदाधिकारी, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (सुधार)  चंद्रशेखर चोरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती पद्मजा केसकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget