अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून काळबादेवी परिसरातील सुवर्ण कारागिरांचे व्यवसाय स्थलांतरीत करावेत - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई ( ८ जानेवारी ) : मुंबईतील काळबादेवी परिसरातील नागरिकांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरातील सुवर्णकार कारागिरांनी उद्योग स्थलांतर करावा. मुंबई महापालिकेने यासंदर्भात बैठक घेऊन कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात काळबादेवी भागात राहणारे हरकिशन गोरडीया यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा उद्योग अन्यत्र स्थलांतर करण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या.

आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारे सामान्यांच्या कामांना गती द्यावी. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिक पातळीवरच निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

काळबादेवी भागातील प्रत्येक घरात सुवर्णकार कारागिरांचा व्यवसाय प्रमाणावर आहे. तेथे भट्ट्या, धुराच्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे धुराच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत असून व्यवसायासाठी भट्ट्यांचा वापर होत असल्याने अग्निसुरक्षेची काळजी पुरेशा प्रमाणात घेतली जात नसल्याची तक्रार गोरडीया यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांच्या
अग्निसुरक्षेच्या कारणावरुन मुंबादेवी, काळबादेवी परिसरातील हा व्यवसाय मुंबई परिसरातच स्थलांतर करावा. या व्यवसायिकांना तीन महिन्याची नोटीस द्यावी. मुंबई महापालिकेने या संदर्भात बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा.

आजच्या लोकशाही दिनात पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव येथील नागरिकांच्या तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिले. पालघर येथील रमेश देशपांडे यांच्या मालकीच्या जमिनीवर अनेक शासकीय प्रकल्प राबविले जात असून त्यात रस्त्याचे तीन प्रकल्प तसेच तलाव आणि घरकुलाचे बांधकाम झाले आहे. या सर्वांची मोजणी करुन आताच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना मोबदला दिला जावा, असे निर्देश देऊन या जमिनीवर कुठलाही शासकीय प्रकल्प होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना पालघर जिल्हा प्रशासनाला दिली. देशपांडे यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबत काय कार्यवाही झाली यासंदर्भात पुढील बैठकीत आढावा घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या निर्णयावर मुख्यमंत्र्यांचे आभार मानत मला आतापर्यंत न्याय मिळाला नव्हता तो तुमच्यामुळे मिळाला अशी भावना देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केली.

सामान्य नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिक स्तरावरच केला जावा. त्यांना लोकशाही दिनात दाद मागण्याची गरज भासता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget