मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती

मुख्यमंत्री, रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत विविध रेल्वे प्रकल्पांचा आढावा

मुंबई ( १२ जानेवारी ) : एमयुटीपी प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात येणाऱ्या विविध रेल्वे प्रकल्पांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला. उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सुचविलेल्या विविध प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेऊन ती कामे सुरू केली जातील, अशी ग्वाही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

हार्बर बोरीवलीपर्यंत, विविध स्थानकाचे होणार आधुनिकीकरण

सीएसएमटी - पनवेल दरम्यान फास्ट इलेव्हटेड कॉरिडॉर विकसित करणे, पनवेल ते विरार दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर विकसित करणे, हार्बर लाइन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढविणे, इतर काही रेल्वे मार्ग वाढविणे अशा विविध प्रकल्पांची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच लोअर परेल, खार रोड, गोरेगाव, मीरा रोड, विरार, घटकोपर, डोंबिवली, नालासोपारा, भाईंदर, मुलुंड, डोंबिवली, भांडुप, वडाळा रोड, सायन, जिटीबी नगर, चेंबूर, शाहाड आदी विविध रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, अशी विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. या सर्व प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मान्यता देऊन हे सर्व प्रकल्प सुरू केले जातील, असे रेल्वे मंत्री गोयल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून मुंबईत रेल्वेची विविध कामे हाती घेण्यात येत आहेत. एकीकडे मेट्रो आणि दुसरीकडे रेल्वेचे नवीन प्रकल्प यांच्या माध्यमातून भविष्यात
सामान्य मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुखकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रेल्वे मंत्रालयाकडे या सर्व प्रकल्पांबाबत पाठपुरावा करणे तसेच या प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडील निर्णय घेण्याचे दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मुंबइत रेल्वेचे जाळे विकसित करताना रेल्वे, एमएमआरडीए, सिडको, महापालिका अशा विविध संस्थानी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी रेल्वे मंत्री गोयल यांनी दिल्या.

बैठकीस रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी, रेल्वे बोर्डाचे सदस्य अभियंता एम. के. गुप्ता, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. गुप्ता, आमदार आशिष शेलार, राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी अजोय मेहता, यु.पी.एस. मदान, प्रवीण परदेशी, भूषण गगरानी, मनोज सौनिक, संजयकुमार आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget