विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ठाणे ( ५ जानेवारी ) : विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी येथील जवाहरबाग स्मशानभुमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जगन्मित्र हरपला, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्मशानभूमीत त्यांचे पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधिवत त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. आज सकाळी दिवंगत वसंतराव डावखरे यांचे पार्थिव मुंबईहून ठाण्यातील हरिनिवास भागातील गिरीराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पुष्प वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

स्मशानभूमीत स्व. डावखरे यांच्या विषयीच्या आठवणीला उजाळा देत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, वसंतराव डावखरे हे अजातशत्रू आणि जगन्मित्र होते, त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. ते सभागृहातील कामकाज अतिशय कुशलतेने चालवीत. स्वत:च्या मनातील दु:ख त्यांनी कधी व्यक्त केले नाही, मात्र कायम हसऱ्या चेहऱ्याने राहिले. मी त्यांना अनेक वर्षे अगदी जवळून पाहिले असून त्यांच्याविषयी माझ्या खूप आठवणी आहेत.

विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, वसंतरावांचे सर्वपक्षीय संबंध होते आणि ते सदस्यांमध्ये लोकप्रियही होते. त्यांचे कार्यालय सर्वांनाच हक्काचे वाटत असे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्याविषयी बोलतांना शब्द अपुरे पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते ठाण्याच्या विकासात नेहमीच मदत करीत राहिले. दिवंगत डावखरे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम १३ जानेवारीस शिरूर तालुक्यातील हिवरे गावी असल्याचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात जाहीर केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget