लावणीसम्राज्ञी यमुनाबाईंना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई ( १५ मे २०१८ ) : लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सिम कला उपासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेल्या लावणीच्या प्रसारासाठी यमुनाबाईंनी आयुष्य वेचले. सर्वसामान्य रसिकांना अस्सल लोककलेची अनुभूती देण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. लोकनाट्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात मोठे योगदान असणाऱ्या यमुनाबाईंचे कलावंतांच्या नव्या पिढीला नेहमीच मार्गदर्शन मिळत होते. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवा जोपासणाऱ्या यमुनाबाईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलेच्या विकासाचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एक अढळ तारा निखळला आहे.

लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या निधनामुळे राज्याने आज देदीप्यमान रत्न गमावले आहे - राज्यपाल
पद्मश्री यमुनाबाई वाईकर या राज्यातील थोर लावणी व तमाशा कलाकार होत्या. सर्व नवोदित कलाकारांसाठी त्या प्रेरणास्थान होत्या. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कलासाधना व कलासेवेसाठी समर्पित केले. जिवा सोमा म्हसे व यमुनाबाई वाईकर यांच्या निधनामुळे राज्याने आज देदीप्यमान रत्न गमावले आहे. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी म्हटले आहे.

तमाशा क्षेत्राला वेगळा आयाम देणारा ज्येष्ठ कलावंत गमाविला - विनोद तावडे
गावागावांतून पोटासाठी कलाप्रदर्शन करणाऱ्या आपल्या कोल्हाटी समाजाला स्थैर्य यायला हवे यासाठी सातत्याने आयुष्यभर संघर्ष करणा-या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम करणा-या ज्येष्ठ कलावंताला आपण गमाविले आहे, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे.

तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, यमुनाबाईं यांनी एकलव्याच्या निष्ठेने इतरांचे तमाशे, लावण्या ऐकल्या आणि आत्मसात केल्या. भावकाम, हातांची अलवार हालचाल, लावणीतला सारा आशय बैठकीत बसून केवळ देहबोलीतून प्रभावीपणे व्यक्त करायला त्या शिकल्या. लावण्यांसह गझल, कव्वाली, ठुमरी यामध्येही त्यांचे योगदान होते. पारंपरिक पद्धतीने बैठकीची लावणी गाणा-या त्या एकमेव गायिका होत्या. आयुष्याच्या मार्गातील अनेक खडतर प्रसंगाना सामोरे जात त्यांनी स्वतःच्या कलेने, लावणीस सम्राज्ञीपदावर पोहचवले. कलेबरोबरच गावाला, समाजाला आणि याच वाटेने चालणाऱ्या असंख्य कलाकारांना आनंदाचे वाटेकरी केले. यमुनाबाईंनी कोल्हाटी-डोंबारी समाजास केंद्र शासनाच्या दप्तरी अत्यंत गौरवाचे स्थान मिळवून दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget