आदिवासी चित्रकलेचा श्रेष्ठ उपासक-प्रसारक हरपला -मुख्यमंत्री

मुंबई ( १५ मे २०१८ ) : वारली या आदिवासी चित्रकलेला वैभव प्राप्त करुन देणारे ख्यातनाम कलाकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांच्या निधनाने आदिवासी समुहाची वैशिष्ट्यपूर्ण कला-संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारा उपासक-प्रसारक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पालघर जिल्ह्यासारख्या दुर्गम भागातील वारली चित्रकला सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या म्हसे यांच्या धडपडीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृतीचे विविध पदर उलगडले. आज वारली चित्रकला ख्यातीप्राप्त झाली असून तिच्या माध्यमातून आदिवासी समुहाचा श्रेष्ठ असा कलाविष्कार समर्थपणे व्यक्त होत आहे. त्यामागे म्हसे कुटुंबियांचे मोलाचे योगदान आहे. म्हसे यांच्या कार्याची दखल पद्मश्रीसारख्या नागरी पुरस्काराने देशाने घेतली असून अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा झालेला गौरव त्यांच्या कलेची महत्ता दर्शविणारा आहे.

राज्याने दोन देदीप्यमान रत्ने गमावली - राज्यपाल

जिवा सोमा म्हसे, लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध वारली चित्रकार जिवा सोमा म्हसे आणि लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याने आज दोन देदीप्यमान रत्ने गमावली आहेत, अश्या शब्दात राज्यपालांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

पद्मश्री जिवा सोमा म्हसे यांनी आपल्या सुबक चित्रांमधून आदिवासी समाजाचे जीवन व चालीरिती जगापुढे आणल्या. एका समृद्ध परंपरेच्या माध्यमातून प्राप्त झालेले वारली चित्रकलेचे ज्ञान त्यांनी आपल्या अंगभूत प्रतिभेने आणि प्रयोगशीलतेने वृद्धिंगत केले. जिवा सोमा म्हसे वारली चित्रकलेचे चालते बोलते विद्यापीठच होते. त्यांची कला जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर

पद्मश्री यमुनाबाई वाईकर या राज्यातील थोर लावणी व तमाशा कलाकार होत्या. सर्व नवोदित कलाकारांसाठी त्या प्रेरणास्थान होत्या. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कलासाधना व कलासेवेसाठी समर्पित केले. जिवा सोमा म्हसे व यमुनाबाई वाईकर यांच्या निधनामुळे राज्याने आज दोन देदीप्यमान रत्ने गमावली आहेत. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे विद्यासागर राव यांनी म्हटले आहे.

आदिवासी चित्रकलेला जागतिक उंचीवर नेणारा श्रेष्ठ चित्रकार हरवला - विष्णू सवरा

वारली या आदिवासी चित्रकलेला जागतिक उंचीवर नेणारा चित्रकार हरवला अशा शब्दात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी पद्मश्री जीवा सोमा म्हसे याना श्रद्धांजली अर्पण केली. पालघर जिल्ह्यासारख्या दुर्गम भागातील वारली चित्रकला सातासमुद्रापार पोहोचविण्यात म्हसे यांचे योगदान आहे.

वारली चित्रकला क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते. कलेच्या इतिहासातील वारली चित्रकला हा उच्च कलाविष्कार आहे. त्यातील जीवा म्हसे यांचे कार्य हे चिरंतर राहील, असेही सवरा म्हणाले.

वारली चित्रकलेला ख्याती मिळवून देणारा सच्चा कलाकार गमावला - विनोद तावडे

वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळूवन देणारे पदमश्री जीवा सोमा म्हसे यांच्या निधनाने एक सच्चा कलाकार कायमचा गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, देशातील पहिले आदिवासी चित्रकार म्हणून जीवा सोमा म्हसे यांची ओळख आहे. आदिवासी बहुल भागात राहूनही आपल्या कलेदवारे सातासमुद्रापार आपली ओळख निर्माण करणाऱ्या म्हसे यांनी पारंपरिक वारली, आदिवासी चित्रकलेच्या माध्यमातून वारली चित्रकलेला वैभव मिळवून दिले. आज वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळत असून यामध्ये पदमश्री म्हसे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. संवेदनशीलता आणि प्रभावी कल्पनाशक्तीच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या म्हसे यांनी आदिवासी कलेचे सांस्कृतिक दर्शन आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून जगाला दाखविले. वारली चित्रकलेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी राज्य शासनाच्या मदतीने त्यांनी वेगवेगळ्या कार्यशाळाही घेतले होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget