(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मराठा आरक्षणासाठी सरकार बांधिल; मराठा समाजासाठी तीन योजना घोषित - पालकमंत्री चंद्रकांत पाटील | मराठी १ नंबर बातम्या
" />

मराठा आरक्षणासाठी सरकार बांधिल; मराठा समाजासाठी तीन योजना घोषित - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर ( ३ ऑगस्ट २०१८ ) : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी सरकार बांधिल आहे. त्याबरोबरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी निम्मी फी भरुन प्रवेश, जिल्हास्तरावर वसतीगृहे आणि तरुण-तरुणींसाठी 10 लाखांपर्यंतची बिनव्याजी कर्ज योजना अशा तीन पूरक योजनाही घोषित केल्या असून या तिन्ही योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिल्याच डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अमल महाडीक, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. आर. पट्टलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्ज हमीसह बिनव्याजी 10 लाखापर्यंतचे कर्ज मराठा समाजातील तरूण-तरुणींना विविध व्यवसाय - उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 10 लाख रूपयांपर्यंतच्या कर्जास शासनाने हमी दिली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या कर्जाचे व्याज शासनामार्फत भरले जाणार असल्याने आता तरुणांना बँकांमार्फत तात्काळ कर्ज उपलब्ध होईल. आतापर्यंत 12 हजार तरुणांनी ऑनलाईन अर्ज भरले असून त्यापैकी पाचशे तरुणांना कर्ज उपलब्ध झाले आहे. उर्वरित तरुणांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करुन देण्यात बँका सक्रीय राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येत्या महिन्याभरात 10 जिल्ह्यात वसतिगृहे सुरु करणार
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यात वसतिगृहे उभारण्याचा क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, येत्या महिन्याभरात राज्यातील 10 जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करण्यात येतील. तर येत्या आठवड्यात पुणे येथे मुलींचे वसतिगृह सुरु होत असून महिन्याभरात मुलांचेही सुरु होईल. राज्यातील पहिले सर्व सुविधायुक्त वसतिगृह कोल्हापूरात विकसित केले असून यामध्ये 72 विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. नजिकच्या काळात कोल्हापूरात मुलींसाठीही स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना निम्मी फी भरुन प्रवेश
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मी फी भरुन प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास सर्व संस्थाचालकांनी मान्यता दिली आहे. यामुळे प्रवेश मिळण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही, अशी ग्वाहीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चाव्या प्रदान
राज्यातील पहिले मराठा विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह कोल्हापूरात सुरु झाले असून यामध्ये 72 विद्यार्थ्यांची मोफत सोय होणार आहे. ही व्यवस्था 100 विद्यार्थ्यांपर्यंत वाढविली जाईल. आज वसतिगृहामध्ये प्रत्यक्षपणे पाच विद्यार्थी राहण्यासाठी आले असून त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रुमच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. सदरबाजार परिसरातील शासकीय निवासस्थान परिसरात अवघ्या दिड महिन्यात विकसित केलेल्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, अंघोळीसाठी गरम पाणी, कॉट, गाद्या, बकेटस् आदी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नजिकच्या काळात कोल्हापूरात मुलींसाठीही स्वंतत्र वसतिगृह विकसित केले जाईल. मुलांसाठीच्या या वसतिगृहासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्थाकडून फार मोठी मदत झाली असून या सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले. हे वसतिगृहे अधिक सुसज्ज आणि समृद्ध करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी बोलताना आमदार अमल महाडीक म्हणाले, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरात पहिलेच सुसज्ज वसतिगृह सुरु झाले असून या वसतिगृहासाठी महाडीक उद्योग समुहातर्फे 2 लाख 51 हजार रुपयांची देणगी त्यांनी घोषित केली. जनतेनेही या वसतिगृहासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या वसतिगृहाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करुन विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेल्या सर्व सुविधायुक्त खोल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या समारंभास संदिप देसाई, नगरसेवक सत्यजित कदम, किरण नकाते, विलास वास्कर, आशिष ढवळे, शेखर कुसाळे, स्मीता माने, उमा इंगळे, रुपाराणी निकम, जयश्री जाधव, सुरमंजिरी लाटकर, अर्चना पाघर, सीमा कदम, संपतराव पवार, प्रांताधिकारी सचिन इथापे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget