वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई ( १५ ऑगस्ट २०१८ ) : भारतीय स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, श्रीमती अमृता फडणवीस यांनीही ध्वजास मानवंदना दिली.यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. यावेळी निवासस्थानातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री महोदयांचे स्वातंत्र्यदिनाचे मनोगत...

बंधू आणि भगिनींनो...

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आणि भारत देशातील या सर्व नागरिकांना मी अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा देतो. ज्यांनी या देशाकरीता आपले आयुष्य दिले, बलिदान दिले त्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींची आठवण करण्याचा दिवस आहे. त्यांना मानवंदना देण्याचा दिवस आहे. तमाम स्वातंत्र्य संग्राम सैनिक, हुतात्मे, क्रांतिकारक या सर्वांना आज या निमित्ताने मी वंदन करतो. त्यासोबत, भारताचे स्वातंत्र्य अबाधित टिकविण्याकरीता आमचे जे जवान सीमेवर लढतात त्या जवानांना मी अभिवादन करतो. जो बळीराजा आपल्या शेतामध्ये राब राब राबतो, हाडाचं काडं करतो, रक्ताचं पाणी करतो त्या बळीराजाला देखील मी अभिवादन करतो.

आज आपला महाराष्ट्र सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच उंच भरारी घेत आहे. विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र सगळीकडे अव्वल ठरतोय. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहरांच अभियान, ग्लोबल सिटीचा इंडेक्स असेल, परकीय थेट गुंतवणूक या प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राने अभूतपूर्व अशीही कामगिरी केली आहे. विशेषत: महाराष्ट्रावर सातत्याने येणारे दु:ष्काळाचे सावट दूर करण्याकरीता ‘जलयुक्त शिवार’ सारखी योजना आपण आमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून 16 हजार गावे आपण जलपरिपूर्ण करतो आहोत. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये एकूण 25 हजार गावे आपण जलपरिपूर्ण करणार आहोत. या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाणलोट क्षेत्राचा विकास होणार आहे. अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या आणि लोकसहभागातून प्रचंड मोठ्या अशा एक पाण्याच्या चळवळीमुळे महाराष्ट्राचे पूर्णपणे परिवर्तन होणार आहे.

सातत्याने पावसाळ्यात खंड येतो अशावेळी पिकांकरिता शाश्वत सिंचनाची सोय ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे. त्याचा दृष्य परिणाम आपल्याला पहायला मिळतो, आपली उत्पादकता वाढते आहे. परंतु उत्पादकता वाढत असताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याकरिता एकीकडे केंद्र सरकारने हमीभाव ठरवताना उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्राने हमीभाव ठरवले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारनेदेखील अन्न धान्यांची रेकॉर्ड खरेदी केली आहे. 1999 ते 2014 या पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यावेळी शासनाने केवळ साडेचारशे कोटी रुपयांच्या अन्नधान्याची एकूण खरेदी केली होती. त्या तुलनेत गेल्या तीन वर्षांमध्ये 8 हजार कोटींची खरेदी राज्य सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतमालाला उत्तम मार्केट मिळाले पाहिजे. याकरिता राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. जागतिक बँकेसोबत देखील दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यासारख्या मागास भागामध्ये तेथील शेतीचे संपूर्ण परिवर्तन करणारा ‘स्वर्गीय नानाजी देशमुख हा कृषी समृद्धी प्रकल्प’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नव्याने सुरु होणारे ॲग्री मार्केटींग, ॲग्री व्हॅल्यू ॲडीशन या संदर्भातील मूल्यवृद्धीच्या प्रकल्पातून शेतीच्या क्षेत्राला शाश्वतता आली पहिजे असा आपला सातत्याने प्रयत्न आहे.

महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे आणि येथे जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. त्याकरता इज ऑफ डुईंग बिजनेसच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य राज्य सरकारने केले. आणि त्याचा दृश्य परिणाम आपल्याला पहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये देशामध्ये एकूण जी गुंतवणूक आली त्यापैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली. त्यासोबत इम्पलॉईज प्रोव्हीडंट फंड ऑर्गनायझेशनने (इपीएफओ) संघटीत क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीचे जे आकडे जाहीर केले त्यानुसार देखील सर्वात जास्त रोजगार हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे. मागील एक वर्षामध्ये 8 लाख रोजगार हा औपचारिक/ संघटित क्षेत्रात (फॉर्मल सेक्टर) महाराष्ट्रात तयार झाला आहे.

एससी, एसटी, ओबीसी या संदर्भात देखील महाराष्ट्राने विविध योजना तयार केल्या आहेत. अतिशय वेगाने समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहचण्याचे काम आपण करतो आहोत. विशेषत: ‘सर्वांकरीता घरे’ या योजनेअंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर देण्याची संकल्पना मा. पंतप्रधानांनी मांडली आहे. ती संकल्पना पूर्ण करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आणि शहरी असो की ग्रामीण दोन्ही क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली आहे.

हे सगळे होत असताना महाराष्ट्राची ही आगेकूच अशीच होत रहावी, महाराष्ट्र सातत्याने पुढे जात राहावा, याकरीता महाराष्ट्राचे पुरोगामित्व हे देखील टिकविण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचा महाराष्ट्र हा सातत्याने पुढे गेला पाहिजे. महाराष्ट्रातला सामाजिक सौहार्द हा देखील टिकून राहिला पाहिजे. समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये याठिकाणी सौहार्द राहिला तरच महाराष्ट्र पुढे जाईल, सर्वांना सोबत घेवून वंचितांना आवश्यक त्याठिकाणी मदत करुन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये असीमीत शक्ती आहे. त्या शक्तीच्या आधारावर महाराष्ट्र आजपर्यंत या देशाचं ग्रोथ इंजिन राहिला आहे. भविष्यात देखील राहणार आहे,

या आपल्या स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनी आपण सर्व लोक मिळून एवढाचं संकल्प करु. महाराष्ट्रातला सर्व समाज एका दिशेने चालावा यासाठी महाराष्ट्रातील वंचितांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ आणि एक अतिशय बलशाली महाराष्ट्र आपण निर्माण करुया. एक बलशाली भारत आपण निर्माण करुया!

भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जी स्वप्ने आपण पाहिली होती, ती स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करु, हा विश्वास आज या निमित्ताने मी व्यक्त करतो. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना, क्रांतिकारकांना आणि सीमेवर लढणाऱ्या आमच्या जवानांना, आमच्या किसानांना या ठिकाणी वंदन करुन आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.

जय हिंद...! जय महाराष्ट्र...!
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget