‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे” - विद्यासागर राव

मुंबई ( १६ ऑगस्ट २०१८ ) : भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपले सर्व कार्यक्रम रद्द करून राज्यपाल दिल्लीला रवाना होत आहेत.

"स्वतंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसेच लोकमानसावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्व होते.

ते एक परिपूर्ण संसदपटू, द्रष्टे मुत्सद्दी, अमोघ वक्ते तसेच सुहृद व्यक्ती होते. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक महासत्ता म्हणून आपला न्याय्य हक्क जगापुढे जोरकसपणे मांडला", असे अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले असलेल्या विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशमध्ये म्हटले आहे.

“श्री वाजपेयी माझे राजकीय जीवनातील प्रेरणास्थान होते. सन १९७५ साली मी करीमनगर (तेलंगणा) जिल्हा जनसंघाचा अध्यक्ष असताना श्री वाजपेयी यांनी करीमनगर येथे एका महासभेला संबोधित केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी आणीबाणी लागली व आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. या घटनेनंतर २३ वर्षांनी मला वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने देशाने एक अभूतपूर्व आदर व लोकप्रियता लाभलेले राजकारणातील ‘भीष्म पितामह’ गमावले आहे; तर मी माझे लाडके नेते गमावले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने तसेच माझ्या स्वतःच्या वतीने मी वाजपेयी यांच्या स्मृतींना आपली आदरांजली वाहतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या
शोकसंदेशात म्हटले आहे.

(राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या संग्रहातून दिलेल्या सन १९७५ मधील सोबतच्या छायाचित्रामध्ये विद्यासागर राव करीमनगर (तेलंगणा) येथे जाहीर सभेला संबोधित करताना दिसत असून अटल बिहारी वाजपेयी बसलेले दिसत आहेत.)

राजकारणातील तपस्वी व्यक्तिमत्व गमावले - शिक्षण मंत्री विनोद तावडे

आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाने देशाची प्रगती साधणारे माजी प्रधानमंत्री, एक मुत्सद्दी राजकारणी, आपल्या वाणीने करोडोंना मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ते आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणावर ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाने राजकारणातील एक तपस्वी व्यक्तिमत्व गमाविले, असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनसंघ आणि पुढे भाजपला दिशा देणारे सर्वसमावेशक नेतृत्व अशीच अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख कायम राहील. नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारे राजकारणी, प्रखर देशभक्त अशी ओळख असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीयच नव्हे तर जागतिक राजकारणावर
आपल्या कर्तत्वाने अमिट ठसा उमटवला. काव्यशास्त्र विनोदात रमणारे कवी मनाचे राजकारणी अशीही त्यांची एक ओळख कधीही न विसरता येणारी आहे. भविष्याचा वेध घेणारे त्यांचे सर्वसमावेशक विचार, मार्गदर्शन, नेतृत्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरणादायी, आश्वासक आणि समाजाला नवी दिशा देणारे ठरतील, असा विश्वासही तावडे यांनी शोकसंदेशात व्यक्त केला.

देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपले – सुधीर मुनगंटीवार

भारतरत्‍न श्रध्‍देय अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या निधनाने देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपल्‍याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. आज एक युगपुरूष काळाच्‍या पडद्याआड गेला असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. 1989 च्‍या लोकसभा निवडणूकीच्‍या प्रचारादरम्‍यान ते चंद्रपूरला सभेसाठी आले होते. त्‍यावेळी मी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातुन उमेदवार होतो. अटलजींनी त्‍यावेळी आपल्‍या भाषणात म्‍हटले होते की, ‘ये नौजवान आगे चलकर बडा नेता बनेगा’. अटलजींचे ते आशिर्वचन माझ्यासाठी आयुष्‍यभराचा ठेवा आहे. माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात त्‍यांचे हे कौतुकोदगार माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले.

एक अजातशत्रु नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्‍तृत्‍वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतिक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता प्रधानमंत्री असे बहुआयामी व्यक्‍तीमत्‍व असलेल्‍या अटलजींच्‍या जाण्‍याने एका ध्‍यासपर्वाची अखेर झाली आहे, तत्वनिष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. भारतीय राजकारणात, समाजकारणात दीर्घकाळ आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला पण तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अटलजींच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत,
असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकसंदेशात म्‍हटले आहे.

उत्तम मार्गदर्शकाला मुकलो - चंद्रकांत पाटील

देशाचे माजी प्रधानमंत्री, संवेदनशील कवी, उत्तम वक्ते, पत्रकार, आमचे मार्गदर्शक, भारतरत्न आदरणीय श्री. अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने आम्ही सर्वजण एका उत्तम मार्गदर्शकाला मुकलो आहोत, त्यांची उणीव कधीही भरुन निघणार नाही. त्यांचे कार्य सर्व भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी आहे, अश्या शब्दांत महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी,

पार्टियां बनेंगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए,

इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए.. या वाजपेयी यांच्या शब्दांतून लोकशाहीवरील त्यांची नितांत श्रद्धा दिसून येते. वाजपेयी जी हे आपल्या विचारांप्रमाणें जगणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कृतीतून प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी प्रेरणा दिली आहे. एक उत्तम वक्ता, संवेदनशील राजकारणी म्हणून आमचे ते आदर्श आहेत. त्यांच्या जाण्याने माझ्यासारख्या त्यांच्या कार्यकर्त्यांची तसेच देशाची वैयक्तिक हानी झाली आहे. त्यांच्या विचारातून, लिखाणातून ते आम्हाला नेहमीच प्रेरणा देतील. त्यांना मी माझ्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हिच प्रार्थना, अशा शब्दांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

स्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावना…

श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी...

अटल, अढळ, अचल, नित्य...

अटलबिहारी वाजपेयी...

केवळ कुण्या एका व्यक्तीचे हे नाव नाही, तर ते नाव आहे एका महासागराचे...

नावाप्रमाणेच अटल, अढळ, अचल...

ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते, आदर्श, सत्यवचनी, कर्तव्य कठोर पण, तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता, आधुनिक युगातील एक महापुरूषाचे आज आपल्यातून असे निघून जाणे, मनाला अतिशय अतिशय वेदना देणारे आहे.

आमचे थोरनेते, राष्ट्रपुरूष श्रद्धेय अटलजी यांचे आपल्यातून निघून जाणे, ही माझी वैयक्तिक हानी आहे! ज्या नेत्यांकडे पाहून आपण राजकारणाची पायरी चढलो, त्या आदर्शांपैकी श्रद्धेय अटलजी एक! लोकशाहीत विविध आयुधं वापरून समाजाची आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा कशी करता येऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यातून घालून दिला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

आज माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यापुढे तरळत आहेत. स्व. प्रमोदजी महाजन यांच्यासमवेत त्यांची झालेली पहिली भेट, त्यानंतर पुढे त्यांचे सातत्याने होत राहिलेले मार्गदर्शन आणि अगदी अलिकडे त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट, हा सारा स्वप्नवत प्रवास. श्रद्धेय अटलजींच्या अशा अचानक निघून जाण्याने कधीही भरून न निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

तन, मन, धनाने राष्ट्रासाठी अगदी सर्वस्व झोकून देणारे आपल्या सर्वांचेच श्रद्धेय अटलजी हे लाडके नेते. संसद असो की एखादी जाहीर सभा, श्रद्धेय अटलजींना ऐकण्यासारखा दुसरा ज्ञानानंद नाही. ज्ञानाचा महासागर, ओघवत्या वक्तृत्वाचे धनी, त्यागाच्या तपस्वी मूर्तीचे जाणे अतिशय वेदनादायी आहे. कधीही न भरून निघणारी ही हानी आहे. श्रद्धेय अटलजी त्यांच्या विचार, मार्गदर्शनाच्या रूपाने आम्हा सर्वांना सतत प्रेरणा देत राहतील. केवळ गतकाळातील नाही, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांचेही ते मार्गदर्शक असतील. या राष्ट्रऋषीला माझे कोटी कोटी वंदन. या दु:खातून बाहेर पडणे किंवा त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे! 

श्रद्धेय अटलजी हे केवळ भाजपाचे नाही, तर या देशाचे सर्वोच्च नेते होते. ज्या मोजक्या नेत्यांना जगभर आदर-सन्मान प्राप्त झाला, त्यातील अटलजी एक. विश्वमान्यतेच्या अटलजींचे नेतृत्त्व सर्व राजकीय पक्षांमध्ये सुद्धा सर्वमान्य होते.

एक विशाल हृदयाचा, मोठ्या मनाचा नेता सदैव आपल्यासोबत असावा, अशीच आम्हा सर्वांची इच्छा. पण, नियती कधीच कुणाचे ऐकत नाही. आज जेव्हा भारताच्या परमवैभवाचा प्रवास अतिशय गतीने सुरू आहे, त्या काळात या परमवैभवाच्या प्रवासाचा पाया ज्यांनी रचला ते आपल्यात असते तर त्यापेक्षा आनंदाचा दुसरा क्षण राहिला नसता. पण, नियतीला ते मान्य नाही.

अटलजी एका कवितेत म्हणतात,

ठन गई।

मौत से ठन गई।

मै जी भर जिया, मै मन से मरूँ

लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?

अटलजी आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारताना मन कठोर करावेच लागेल. भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या, अटलजींवर ज्यांनी नि:स्सिम प्रेम केले, ते या देशातील तमाम नागरिकांच्या दु:खात मी सहभागी आहे. एकमेकांना धीर देण्याच्या पलिकडे आपल्या हातात तरी काय आहे?

अटल, अढळ, अचल असलेले हे नेतृत्त्व नित्य आपल्यासोबत राहील, विचारांच्या रूपाने, दिशादर्शकाच्या रूपाने, मार्गदर्शकाच्या रूपाने...

माझी भावपूर्ण श्रद्धांजली...

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या निधनाबद्दल महापौरांकडून श्रध्‍दाजंली

देशाच्‍या राजकारणातील ऋषीतुल्‍य असे व्‍यक्तिमत्‍व तसेच भारतीय संसदीय राजकारणातील पितामह, अमोघ वक्‍तृत्‍वाचे धनी, संवेदशनशील कवी आणि भारताचे माजी पंतप्रधान ‘ भारतरत्‍न’ अटलबिहारी वाजपेयी यांचे आज दि. १६ ऑगस्‍ट २०१८ रोजी दिल्‍लीतील एम्‍स रुग्‍णालयात वृध्‍दापकाळानं निधन झाल्‍याने मुंबईचे प्रथम नागरिक तथा महापौर म्‍हणून मी प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर समस्त मुंबईवासियांच्‍या वतीने त्‍यांना श्रध्‍दाजंली अर्पण करीत आहे.

शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी यांच्‍या अनेक बैठका व गाठीभेटी महापौर निवास येथे झाल्‍या.महापौर निवास हया घटनांचा साक्षीदार आहे. त्‍यांचे निधन झाल्‍याचे समजताच खुप दुःख झाले . सेना- भाजप युती टिकविण्‍यामध्‍ये वाजपेयीजींचा सिंहाचा वाटा होता आणि त्‍यांनी नेहमीच युतीच्‍या मदतीचा हात शिवसेना प्रमुखांस दिला. समस्‍त मुंबईकर त्‍यांच्‍या कुटुंबियांच्‍या दुःखात सहभागी असून एका युगाचा अस्‍त झाला असून मुंबईच्‍या सर्व नागरिकांच्‍या वतीने मी मुंबईचा प्रथम नागरिक म्‍हणून अटलबिहारी वाजपेयीजी यांना भावपूर्ण श्रध्‍दांजली वाहतो. त्‍यांच्‍या आत्‍म्‍यास चिरशांती लाभो हिच ईश्‍वरचरणी प्रार्थना.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget