दिल्ली ( २१ जुलै २०१८ ) : दिल्ली येथे झालेल्या जीएसटी (GST) परिषदेच्या बैठकीत आज सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने या साठी सर्वप्रथम पहिला आवाज महाराष्ट्रात उचलला होता. सॅनिटरी नॅपकिन करमुक्त व्हावेत यासाठी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सर्वप्रथम मुंबई विद्यापीठ कुलगुरू, तंत्रशिक्षण संचालनालय संचालक, बृहन्मुंबई व कल्याण-डोंबिवली,नाशिक महानगर पालिका आयुक्त, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुणगटीवार यांच्या मंत्रालयातील दालनात सॅनिटरी नॅपकिन भेट देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन सुद्धा केले होते. यावेळी स्वतः राज्य अर्थमंत्री यांनी दिल्ली मधील GST कौन्सिलच्या बैठकीत जरूर हा मुद्दा मी घेईन असे आश्वासन मनसेला लेखी स्वरुपात दिले होते. मात्र या आश्वासनावर विसंबुन न राहता शालिनी ठाकरे यांनी ४ जून २०१७ रोजी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची सुद्धा भेट घेऊन सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करण्याची तसेच बचत गटांमार्फत बनविलेल्या सॅनिटरी नॅपकिन सुद्धा करमुक्त करण्याची मागणी मनसेच्या वतीने केली होती. आज केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन करमुक्त केल्याची घोषणा केली असून त्यामुळे भारतातील महिला वर्गाला एक प्रचंड दिलासा मिळाला आहे. "आजही देशातील ८० टक्के महिला महागड्या सॅनिटरी नॅपकिन वापरापासून वंचित असून, त्यांना आज कुठेतरी न्याय मिळाला आहे असे मी समजते.हि लढाई फक्त मनसेची नसून सर्व महिला शक्तीची होती आणि त्यात सर्व महिला वर्गाचा विजय झाला आहे " अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी या निर्णयाबाबत बोलताना दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा