(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान | मराठी १ नंबर बातम्या
" />

महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली ( ९ ऑगस्ट २०१८ ) : ‘भारत छोडो’ आंदोलन, गोवा मुक्ती, हैद्राबाद मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला.

क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 76 व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सन्मान झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ. अवधूत डावरे आणि वसंत अंबुरे, मुंबईतील
गदाधर गाडगीळ आणि अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वसंतराव माने या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यसैनिक देवाप्पा खोत हे सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील आहेत. सध्या 99 वर्षाचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खोत यांनी कुपवाड सेंटर (चावडी ) येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभाग घेतला होता. कुपवाड येथून जवळ असणारे माधवनगर येथे रेल्वेरुळ त्यांनी उद्धवस्त केले होते. तसेच तत्कालीन धुळे कोषागार कार्यालयालाही हानी पोहोचविली होती. स्वातंत्र्यसैनिक गणपतराव गभणे, नागपूर जिल्ह्यातील आहेत सध्या ते सुमारे 80 वर्षांचे असून आजही त्यांच्या आवाजात दम आहे. गोवा मुक्ती आंदोलनात श्री. गभणे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. 15 ऑगस्ट 1955 ला कॉम्रेड हेमंतकुमार बसू यांच्या नेतृत्वामध्ये दोडामार्गे आईखेडा येथून त्यांनी गोव्याच्या जंगलात जाऊन सत्याग्रह केला. पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना खूप मारहाण केली होती. हैद्राबाद मुक्ती आंदोलनातही गभणे त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. स्वातंत्र्य सैनिक डॉ. अवधूतराव डावरे हे परभणी जिल्ह्यातील आहेत. डावरे यांनी 1938 ते 1948 पर्यंत झालेल्या विविध आंदोलनात भाग घेतला होता. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सत्याग्रहींना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच परभणीमध्ये झालेल्या या आंदोलनाचे नियोजन केले. तत्कालीन इंग्रजी शाळा, महाविद्यालयामध्ये जनजागृती करून त्यांनी शाळा बंद पाडल्या. विदेशी वस्त्र आणि वस्तूंची होळी केली होती. झेंडा सत्याग्रहातही डावरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा कारागृहात पोलीस स्टेशनवर तिरंगा ध्वज फडकविला होता. त्यांनी 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांनी लोणी कॅम्पमध्ये रझाकारांशी मुकाबला केला होता.

स्वातंत्र्य सैनिक वसंत अंबुरे हे परभणी जिल्ह्याचे आहेत. त्यांचे वडील चंद्रनाथ अंबुरे हे सक्रिय स्वातंत्र्यसैनिक होते. 1947 मध्ये वसंत अंबुरे यांचे वडील परभणी आणि औरंगाबाद या तुरूंगात होते. त्यावेळी वसंत अंबुरे भूमिगत राहून स्वातंत्र्य संग्रामाचे कार्य पूर्ण केले. हैद्राबाद मुक्ती संग्रामातही वसंत अंबुरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

स्वातंत्र्यसैनिक गदाधर गाडगीळ मुंबई येथे स्थायिक असून सध्या 88 वर्षांचे आहेत. गाडगीळ हे आपल्या काही मित्रांसोबत गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभागी झाले होते. 15 ऑगस्ट 1954 ला ‘पोर्तुगीज चले जाव’
या नाऱ्याने सत्याग्रहाची सुरूवात केली. या संग्रामात गोळीबार झालेला होता. 19 सप्टेंबर 1954 मध्ये त्यांना कैदही झालेली होती.

स्वातंत्र्यसैनिक वसंत प्रसादे, अरविंद मनोलकर आणि बाळासाहेब जांभुळकर या तिन्ही स्वातंत्र्यसैनिकांनी दादरा-नगर हवेलीच्या संग्रामात 1954 वर्षी सक्रिय सहभाग नोंदवून लढा यशस्वी केला. अपुऱ्या शस्त्र व इतर
साहित्यानिशी केवळ जिद्दीच्या भरवश्यावर मातृभूमीला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडविले.

स्वातंत्र्यसैनिक अनंत गुरव यांनी 1954 च्या दादरा नगर हवेलीच्या आंदोलनात भाग घेतला. फ्रान्सिस मस्करान्स आणि तानाजी रावराणेजीच्या नेतृत्वात सत्याग्रही तुकडीसोबत दादरा नगर हवेलीमध्ये शिरले. यामध्ये पोलीसांद्वारे झालेल्या गोळीबारात गुरव यांना उजव्या हातावर गोळी लागली होती. 3 जानेवारी 1955 ला गुरव यांनी होडीतून तानाजी रावराणेजी यांच्या सोबत गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि राष्ट्रध्वज फडकविला. ऑगस्ट 1955 च्या पहिल्या आठवड्यात बांदा-पत्रादेवी येथे झालेल्या सत्याग्रहात सामील झाले होते. या सत्याग्रहात श्रीमती सहोदरा रॉय या जखमी महिलेला वाचविताना गुरव यांना पायावर गोळी लागली. गुरव हे मुंबईत वास्तव्यास आहेत.

स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. ते आपल्या 27 सहकाऱ्यांसोबत गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झाले. या महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले.
यामध्ये पोर्तुगीज सैन्याकडून आंदोलनकर्त्यांवर गोळ्या घातल्या गेल्या होत्या. मात्र, माने यांच्या नेतृत्वात असणाऱ्या सत्याग्रहींनी जीवाची पर्वा न करता गोवा मुक्ती संग्रामचे आंदोलन सुरू ठेवले. गोव्यातील एका गावात या सत्याग्रहींनी राष्ट्रध्वज फडकविला. याची माहिती जेव्हा पोर्तुगीज सैनिकांना मिळाली. तेव्हा, त्यांनी माने यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण करून गोव्याच्या सीमेबाहेर हाकलून लावले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget