(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पाश्चात्य चॉकलेटचे आक्रमण थोपवण्यासाठी मिठाईवाल्यांची मोदकाची ढाल | मराठी १ नंबर बातम्या
" />

पाश्चात्य चॉकलेटचे आक्रमण थोपवण्यासाठी मिठाईवाल्यांची मोदकाची ढाल

ठाणे (३१ जुलै २०१८) : असंख्य वेगवेगळी रुपं घेऊन जसे गणराय मूर्तीरुपाने अवतरतात, अगदी तसंच आता बाप्पांचा लाडका नैवेद्य म्हणजे मोदकही विविध रंगांत, आगळ्यावेगळ्या स्टफिंगसह, पण सारख्याच आकारात मिळतात. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘मोदक महोत्सवा’त माव्याचे, उकडीचे, काजू पेस्टचे, बदामाचे, पंचखाद्याचे अशा असंख्य प्रकारांचे मोदक एकाच छत्राखाली चाखण्याची संधी गणेशभक्तांना आणि खवय्यांना मिळणार आहे.

गणरायाचा नैवेद्य आणि महाराष्ट्राची पारंपारिक ‘स्वीट डिश’ म्हणून ओळखला जाणारा मोदक, त्याचे विविध प्रकार आणि राज्यातील मोदक उत्पादक इण्डस्ट्रीचा गेल्या काही वर्षांत अत्यंत झपाट्याने झालेला विकास याचे अदभूत दर्शन ‘मोदक महोत्सवा’त मोदकप्रेमींना घडणार आहे. त्यासाठी भारतीय पारंपारिक मिठाई बनवणारे ७५ हून अधिक उत्पादक-विक्रेते प्रथमच ठाण्यात आयोजित ‘मोदक महोत्सवा’च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. ठाणे पश्चिमेकडील तीनहात नाका येथील ‘ठाणे क्लब’मध्ये आठ व नऊ सप्टेंबर असे
दोन दिवस हा महोत्सव संपन्न होणार आहे.

“गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य अशी मोदकाची ओळख असली तरी तो एक अस्सल भारतीय मिठाईचा प्रकार आहे. दुर्दैवाने, मोदकासह आपल्या सर्वच पारंपारिक मिठायांपासून आपण दूर जात असून चॉकलेट, केक यांसारख्या पाश्चात्य मिठाईसदृश खाद्यपदार्थांकडे वळत आहोत. त्यामुळे या देशात जन्मलेल्या मिठाईच्या पदार्थांचीच आज उपेक्षा होऊ लागली आहे. आपल्या समृद्ध गोडधोड परंपरेचा वारसा आजच्या पिढीलाही कळावा”, यासाठीच मोदक महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मोदक महोत्सवाचे आयोजक ‘मीठा इंडिया’चे निमंत्रक कॅप्टन कमल चड्ढा यांनी दिली. मोदक महोत्सवात महाराष्ट्रातील अनेक मिठाई उत्पादक-व्यापारी आपापले वैशिष्ट्यपूर्ण मोदक खवय्यांसाठी सादर करणार आहेत.

‘मीठा इंडिया’ने आयोजित केलेल्या या मोदक महोत्सवाचे कौतुक करताना मुंबईतील ख्यातनाम अशा ‘कांतीलाल दामोदर मिठाईवाला’चे संस्थापक-संचालक मनोज कांतीलाल सोनी म्हणाले, “महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आहे, ती जपणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. मोदक हे या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं प्रतीक आहे. त्यामुळे मोदक महोत्सव म्हणजे गणरायाप्रमाणे इथल्या खाद्यसंस्कृतीलाही केलेलं वंदनच आहे.” मिन्टेल या लंडनमधील मार्केट रिसर्च कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, चॉकलेट खाद्यपदार्थांसाठी भारत ही सर्वाधिक वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आहे. पाश्चात्य गोडपदार्थांना जमेल तितका आळा घालून भारतीय मिठायांना उत्तेजन देण्यासाठी तसंच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी ‘मोदक महोत्सव’ महत्वाची भूमिका बजावेल, असं मतही कॅप्टन चड्ढा यांनी व्यक्त केलं.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget