(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); टंचाई निवारणासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांचे यंत्रणांना निर्देश | मराठी १ नंबर बातम्या
" />

टंचाई निवारणासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांचे यंत्रणांना निर्देश

अहमदनगर ( २५ ऑक्टोबर २०१८ ) : जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावनिहाय आढावा घेऊन या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्याचा समावेश करुन परिपूर्ण टंचाई आराखडा तयार करा, असे निर्देश पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिले.

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रा.शिंदे विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी आणि पांगरमल गावांना भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अधिकारी-पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे आदींसह पदाधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाईसदृश तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यातील गावात सर्वप्रकारच्या आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. त्यासाठीचे नियोजन विविध विभागांनी तयार करण्याच्या सूचना दिली. बुडकी खोदणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, खाजगी विहीर अधीग्रहण, टैंकर्स-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे आदी उपाययोजना या टंचाईसदृश परिस्थितीमध्ये घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाहणी करुन आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी, राज्य शासनाने टंचाईसदृश तालुक्यात जाहीर केलेल्या उपाययोजना आणि सवलतींच्या अंमलबजावणी संदर्भात संबंधिताना यावेळी सूचना केल्या. आगामी काळात पाणी आणि चारा यांचे नियोजन करुन त्याची उपलब्धता कशी होईल हे पाहा. मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करा, असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

सध्याच्या परिस्थितीत एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. पाझर तलावातील गाळ काढणे, वनतळी, सीसीटी, रोपवाटिका निर्मिती, चारा नियोजन, पशुधनाची काळजी आदी बाबींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पालकमंत्री प्रा.शिंदे यांऩी सांगितले.

नगर तालुक्यातील गावांना भेटी दिल्यानंतर आणि आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget