(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्रीचे उदघाटन | मराठी १ नंबर बातम्या
" />

महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्रीचे उदघाटन

नागपूर ( २१ ऑक्टोबर २०१८ ) : राज्यातील 34 हजार गावात 3 लाखापेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचतगट आहेत. या गटामार्फत उत्पादित वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल तसेच बचतगटांना उत्पादन व व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केली.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात ग्राम विकास व पंचायत राज विभागातर्फे महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन दिनांक 2 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनाबद्दल माहिती घेतली.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, खासदार डॉ.विकास महात्मे आमदार सर्वश्री प्रा. जोगेन्द्र कवाडे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, मल्लीकार्जून रेड्डी, आशिष जयस्वाल, सचिव ग्रामविकास असीम गुप्ता, विभागीय आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला आदी उपस्थित होते.

महिला बचतगटांच्या चळवळीत राज्यातील 38 लक्ष कुटुंब जुळले असुन या माध्यमातुन मोठी व्यावसायिक साखळी निर्माण झालेली आहे. लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या महिला शक्तीचा देशाच्या उत्पन्नात वाटा असल्याखेरीज देश पुढे जाणार नाही, असे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थव्यवस्थेला चालना देण्याची प्रमुख भूमिका महिला करू शकतात. विकासाच्या वाटचालीमध्ये माता भगिनींना सहभागी केल्यास शाश्वत विकास होईल. 5 लाख कुटूंबाची उपजीविका चालवणारी बचतगटाची चळवळ 500 कोटीची उत्पादन क्षमता ठेवते.

महिलासाठींच्या वेगवेगळ्या योजनांना आतापर्यंत 42 हजार कोटीचे अर्थसहाय दिले आहे.

बचतगटाच्या चळवळीत बॅंकांनी दिलेले सहकार्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला. महिला बचतगट कर्ज बुडवत नाहीत किंबहुना वेळेच्या आधी कर्ज चुकते करतात, असा अनुभव असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कुशल मनुष्यबळाची देशात बरीच मागणी आहे. मागणी व पुरवठा याच्यात व्यस्ततेचे प्रमाण आहे. हे लक्षात घेवून शासनाने दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातुन 27 हजार युवक-युवतींना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी 14 हजार तरूण-तरूणींना रोजगार प्राप्त झाला आहे तर 1 लक्ष 25 हजार तरूण-तरूणींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी 96 हजार प्रशिक्षणार्थींनी स्वयंरोजगार सुरू केले आहे. जिवनोन्नती अभियानाच्या माध्यमातुन राज्यात उत्तम काम सुरू आहे.

अस्मिता योजनेच्या माध्यमातुन सॅनिटरी नॅपकीन अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नॅपकीनच्या उत्पादनात महिला बचतगट मोठ्या कंपन्याच्या ब्रॅंडला टक्कर देत आहेत. बचतगटांच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांना मोठ व्यासपीठ अस्मिता बाजारच्या माध्यमातुन मिळणार आहे. यातुन साखळी पद्धतीने उत्पादन बाजारपेठेपर्यंत पोहोचतील.

कुक्कुटपालनाच्या माध्यमातुन पिवळी क्रांती झाली आहे. अंडी उत्पादनाने बचतगट आर्थिक‍ प्रगतीबरोबरच माता व बाल संगोपनासाठी सहाय्यक ठरत आहेत. केंद्र व राज्याच्या पोषण आहार योजनांमध्ये देखील महिला बचतगटाचा सहभाग आहे. महिलांसाठी अनेक योजना आहेत, त्यांचा लाभ घेतल्यास महिला गरिबीतून आर्थिक समृद्धीकडे जावु शकतात, असे आश्वासक उद्गगार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

महालक्ष्मी सरसचे नागपूरात पहील्यांदा आयोजन होत असल्याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. महिलांना रोजगार मिळवुन देणे, हाच शासनाचा अग्रकम राहिला आहे. नागपूरमध्ये बचतगटांच्या महिलांना हरित क्षेत्र विकास उपक्रमाद्वारे 1 हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत रामटेक, काटोल या तालूक्यातील मच्छिमारांच्या व पशुसंवर्धन करणाऱ्या बचतगटासाठी 50 कोटीचे अनुदान देण्यात आले आहे. वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेपासून विविध उत्पादन देखील महिला करू शकतात. या माध्यमातून जिल्ह्यातील 10 हजारावर महिलांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगाराचा लाभ मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी महिला बचतगट चळवळीचे स्वरुप बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. पुढील तीन महिन्यात राज्यातील बचतगटासाठी ऑनलाईन मंच तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. तर आभार रविद्र शिंदे यांनी मानले.

स्वयंसहायता बचत गटांचा सत्कार

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उमेद अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांना उत्पादन वाढीसाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत मंजूर निधी तसेच बॅंकेमार्फत मंजूर कर्ज रकमेच्या धनादेशाचे

वाटप करण्यात आले. यामध्ये हार्दिक स्वयंसहाय्यता महिला समूह, अन्नपूर्णा ग्राम संघ यवतमाळ, संघर्ष ग्राम संघ चंद्रपूर यांच्यासह सखी महिला स्वयंसहाय्यता संघ, लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता संघ, सरस्वती महिला बचत समूह सावंगी तसेच जयदुर्गा महिला स्वयंसहाय्यता संघ रत्नापूर (वर्धा) आदीचा समावेश होता. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेऊन विविध कंपनी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये नियुक्ती प्राप्त प्रणाली मेश्राम, तौफीक शेख, दीपक फुलमाळी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. वर्ष 2017-18 या कालावधीत ‘उमेद’मध्ये उल्लेखनीय कार्य करणारे वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने तसेच कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचा यावेळी स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

उमेद मध्ये कार्य करणाऱ्या महिला स्वयंसहायता समूहाकरिता विविध योजना राबविण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बॅक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया या बँकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या बँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी स्वीकारले.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वेबसाईटचे लोकार्पण

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संस्कृतीची माहिती देणाऱ्या वेबसाईटचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार मल्लीकार्जून रेड्डी, सुधाकर देशमुख, आशीष जयसवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव आदी उपस्थित होते.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे व्यवस्थापक दीपक खिरवडकर यांनी वेबसाईट निर्मितीसह या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. www.sczcc.gov.in या वेबसाईटच्या तांत्रिक निर्मितीमध्ये व्हीएनआयटीच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे प्रा. पराग देशपांडे व डॉ. मीरा धाबू यांनी सहकार्य केले आहे. वेबसाईटवरील गीताची रचना चंद्रगुप्त वारनेकर, संगीत अमर कुलकर्णी व शैलेश दानी यांनी दिले आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याबरोबर त्यांची स्तुती करणारे हे गीत संस्कृत भाषेत रचले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget