(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यभरात 1 कोटी 8 लाख बालकांना गोवर- रुबेलाचे लसीकरण - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती | मराठी १ नंबर बातम्या
" />

राज्यभरात 1 कोटी 8 लाख बालकांना गोवर- रुबेलाचे लसीकरण - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती


मुंबई (८ डिसेंबर २०१८) : संपूर्ण राज्यभर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या दहा दिवसांत 1 कोटी 8 लाख बालकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरणाचे 35 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 60 टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण करून भंडारा जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. ही लस संपूर्ण सुरक्षित असल्याचे सांगत पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज सांगितले.

आरोग्य, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास विभाग यांमधील उत्तम समन्वय व व्यापक जनजागृतीमुळे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मोहिमेत आतापर्यंत 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील 16 लाख 27 हजार बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. वय वर्ष 5 ते 10 वर्ष वयोगटातील 41 लाख 55 हजार आणि 10 ते 15 वर्ष वयोगटातील 51 लाख 6 हजार मुला-मुलींना लसीकरण करण्यात आले. मोहिम सुरु झाल्याच्या 10 दिवसात एकूण राज्याच्या अपेक्षित लाभार्थ्यांपैकी 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत 100 टक्के गोवर रुबेला लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

राज्यातील एकूण शाळांपैकी 96 हजार शाळांमध्ये लसीकरण सत्रे यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. या मोहिमेत आतापर्यंत खालील जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामध्ये भंडारा – (60 टक्के), सिंधुदुर्ग – (57 टक्के), गडचिरोली – (52 टक्के), कोल्हापूर – (50 टक्के) व यवतमाळ – (49 टक्के)

चांगली कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई – (46 टक्के), वसई-विरार-(42 टक्के), धुळे – (42 टक्के) व कोल्हापूर – (41 टक्के) यांचा समावेश आहे. मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीकरण झालेल्या सर्व शाळांत मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे.

ठाणे जिल्हयातील बऱ्याच मोठी पटसंख्या असलेल्या शाळांत लसीकरणाचे अपेक्षित प्रमाण पूर्ण करण्यात आले.नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व मीरा-भाईंदर महानगरपालिका येथील शाळांना तेथील महापौर, आयुक्त यांच्या हस्ते चांगली कामगिरी केल्याबद्दल विजयाचा झेंडा प्रदान करण्यात आला आहे.

जनजागृतीमुळे लसीकरण मोहिमेला शाळांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाने तयार केलेले "चला… रुबेला गोवर लसीकरण मोहिम यशस्वी करुया" हे गीत रचले तर ‘आता भिणार नाय… आता रडणार नाय… टाळाटाळ करणार नाही… लस टोचून घेणार आम्ही’ हे आवाहन गीत राज्यातील शाळांमध्ये ऐकवले जात आहे.

कडेगाव सांगली येथील मदरशांमधील 100 टक्के मुलांनी लसीकरण करून घेतले असून राज्यभरात ज्या ठिकाणी लसीकरणाबाबत गैरसमजातून नकार देण्यात आला अशा शाळांमधूनही आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

काही ठिकाणी लसीकरणानंतर मुला-मुलींना किरकोळ स्वरूपाचा त्रास जाणवला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रथमोपचार करून खबरदारीचा उपाय म्हणून काही मुलांना दवाखान्यात दाखल करून घेतले, त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते मात्र काही तासानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले.

पालकांनी घाबरून न जाता बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget