(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या
" />

रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (२३ डिसेंबर २०१८) : अनेक वर्षाच्या संघर्षानंतर वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेला चालना मिळाली असून ही योजना पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच या योजनेच्या जलपुजनासाठी येऊ असा विश्वास व्यक्त करुन राज्यातील रखडलेल्या सर्व सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाचा शुभांरभ मौजे रेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजना बंदिस्त नलिकेव्दारे वितरण होणार असल्याने प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल. मोठ्या प्रमाणावर जमीन ओलीताखाली येईल. असे सांगून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक वर्षापासून रखडलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पुढील सहा महिन्यात टप्प्या- टप्प्याने पूर्ण करण्यात येतील. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दिड लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. या योजनांसाठी शेतकऱ्यांची हजारो एकर अधिग्रहीत करावी लागली असती ती बंदिस्त नलिकेव्दारे काम होणार असल्याने आता अधिग्रहीत करावी लागणार नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची बचत झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाचा शुभांरभाचा आजचा हा सुवर्ण दिवस हे या भागाचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कष्टाच्या व पाठपुराव्याचे फलीत आहे. या योजनेमुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. ही योजना बंदिस्त नलिकेव्दारे पुर्ण होणार असल्याने शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्यालाही पाणी मिळेल, असे सांगून बंदीस्त नलिकेव्दारे पाणी होणार असल्याने भूसंपादनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे. राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, बळीराजा कृषी सिंचाई योजना या योजनामधून केंद्रातून 30 हजार कोटी रुपये आणण्यात आले आहेत. यातून महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. पूर्ण करण्यात येत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्रिस्तरीय समित्या तयार करुन योग्य त्या बाबींना मान्यता देवूनच टेंडर प्रक्रिया करण्यात येत असल्याने पारदर्शकता आली आहे. प्रकल्पाच्या खर्चात बचत होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळींब, द्राक्ष व फळपिके घेतात. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत आपला माल पाठवता यावा यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट तयार करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना येथून थेट विदेशात माल पाठविता येईल व त्यातून आर्थिक उन्नती होईल. चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मागणी करण्यात येत असलेली धरणाच्या खालील जागाही देण्यात येईल त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जिल्ह्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरु होत असल्याने सर्वांगिण विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या कामात ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत केली त्यांचे अभिनंदनही केले.

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले, राज्यातील रखडलेले जल सिंचनाचे प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करण्यात येत असून विविध 265 कामांना सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली आहे. टेंभू योजनेसाठी 5 हजार कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कृषी सिंचाई योजनेमध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळी असल्याचे सांगून ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तेथून पाणी आणून या भागांना देण्यात येईल. वाकुर्डे उपसा सिंचन योजना एका वर्षात पूर्ण करण्यात येईल असे सांगून, त्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करुन दिला असे ते म्हणाले. यापुढे कालव्यांची सर्व कामे बंदीस्त पध्दतीने करण्यात येत असल्याने खर्चात बचत होईल व पाण्याला गळीतीही लागणार नाही असे सांगून, चांदोली पर्यटन क्षेत्र विकासासाठी लागणाऱ्या जमीनबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, वाकुर्डे उपसा सिंचन योजना या भागाला वरदायी ठरणार असून यासाठी शासनाने भरीव निधी दिला आहे. या योजनेचा वाळवा,शिराळा,कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. यावेळी त्यांनी चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी. सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करावा व पुनवत येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी केली.

या कार्यक्रमात गुलाब पुष्प, पुस्तक व चांदीची तलवार देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक सुखदेव पाटील यांनी केले. आभार प्रसाद पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांसह परिसारातील शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget