राज्यस्तरीय मुद्रा संमेलन

मुंबई (१९ डिसेंबर२०१८) : बेरोजगारीतून रोजगाराकडे नेणारा प्रवास हा मुद्रा बँक योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून शक्य असून त्यासाठी योजनेशी संबंधित सर्व घटकांनी विशेषत: बँकांनी मन लावून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय मुद्रा संमेलनाचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वित्त व‍ नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार अनिल सोले, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, मुद्रा योजनेचे व्यवस्थापकीय संचालक आलोक गुप्ता, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक थोरात, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिंधुदूर्ग चे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, राज्यातील मुद्रा योजनेचे समिती सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी, योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी राज्याच्या स्वत: च्या http://mahamudra.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु केलेल्या यशस्वी उद्योजकांच्या यशकथांचे “यशोमुद्रा” हे पुस्तक ही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करणाऱ्या यशस्वी उद्योजकांचा यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. हे संकेतस्थळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असून यावर योजनेत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणते प्रश्न उपस्थित होतात, त्याची उत्तरे (FAQ), लहान व्यवसायांचे प्रकल्प अहवाल, ते तयार करण्यासाठीचे मार्गदर्शन, रोजगाराशी संबंधित महास्वयम संकेतस्थळासह सर्व महत्वाच्या संकेतस्थळांची जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या क्षेत्रात प्रत्येक युवक-युवतीची स्वत:ची “जागा” निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे सांगून मुनगंटीवार पुढे म्हणाले, छोटे उद्योजक हे घेतलेले सगळे कर्ज परत करतात यावर बँकांनी विश्वास ठेवावा आणि योजनेत कर्ज मागू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना अर्थसहाय्य करावे. “ उठ तरूणा जागा हो, आर्थिक स्वातंत्र्याचा धागा हो” हा योजनेचा गाभा असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले विषमतामुक्त भारताचे हे महत्वाकांक्षी पाऊल आहे. “महामुद्रा” हे महाराष्ट्राचे स्वत:चे संकेतस्थळ तरूणांना मार्गदर्शक ठरणार असून यातून अनेकांच्या प्रेरणादायी पाऊलखुणा आपल्याला पहायला मिळतील.

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात ही गाव-शहर आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असून त्यासाठी त्याला मुद्रा योजनेतून कर्ज देणे हा एक महत्वाचा उपाय असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आपल्याला काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणाऱ्या हातांची संख्या वाढवता आली पाहिजे. याच उद्देशाने प्रधानमंत्र्यांनी ही योजना घोषीत केली. योजनेची माहिती तळागाळातील लोकांना देण्याची जबाबदारी योजनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक घटकाची आहे. विशेषत: बँक अधिकाऱ्यांनी यात अधिक मन लावून काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात योजनेतून १ कोटी ४९ लाखांहून अधिक लोकांना ६५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज वितरित झाले आहे. बँकांनी कर्ज दिलेल्या प्रत्येक खातेदाराची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, ही माहिती जनतेसमोर ठेवावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. सक्षम गाव हा प्रगत देशाचा आधार असतो. आपल्याला गाव सक्षम करावयाचा आहे. कौशल्य विकास आणि मुद्रा योजनेची सांगड घातल्यास या प्रक्रियेला अधिक गती मिळेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुद्रा योजनेचे कर्ज घेऊन यशस्वीरित्या उद्योग व्यवसाय करणाऱ्या सर्व उद्योजकांचे तसेच प्रातिनिधीक स्वरूपात आज ज्यांचा सत्कार झाला अशा उद्योजकांचे त्यांनी अभिनंदन केले.

समाजव्यवस्थेत सर्वांना जगा आणि जगू द्या चा अधिकार आहे. आपण जेव्हा भारत माता की जय म्हणतो तेव्हा त्याची कृती ही आपल्यापासून सुरु झाली पाहिजे, अशी भावना व्यक्त करून मुनगंटीवार म्हणाले, मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीत आपल्या सर्वांची हीच भूमिका राहिली पाहिजे. मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग आणि जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांनी ही योजनेचा लाभ अधिकाधिक युवक-युवतींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

रोजगाराच्या क्षेत्रात नवा इतिहास निर्माण होईल- केसरकर

कौशल्य विकास आणि मुद्रा योजनेची सांगड घातल्यास रोजगाराच्या क्षेत्रात नवा इतिहास निर्माण होईल असे सांगून राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्यात योजनेची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे खूप नेटाने प्रयत्न करत आहेत, योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगल्या कल्पना या उत्तम पद्धतीने राबविणे गरजेचे असते, मुद्रा योजनेत ही तेच अपेक्षित आहे. कौशल्य हे फक्त रोजगाराशी निगडित नाही तर कुशल मनुष्यबळ हा सक्षम आणि प्रगत भारताचा आधार आहे. हेच लक्षात घेऊन सिंधुदूर्ग येथे सेंटर ऑफ एक्सल्ंस ची स्थापना करण्यात आली आहे. स्वयंरोजगारामध्ये कमीपणा नाही हे दाखवून देऊन मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणारी, आयुष्याला उभं करणारी, तळागाळातील माणसांचे हित जपणारी ही योजना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्यात योगदान देणारी ही योजना आहे त्यामुळे आपण सर्व मिळून ही योजना यशस्वी करूया, वर्ष अखेरीपर्यंत योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणूया, असे आवाहन ही केसरकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी केले. कार्यक्रमात कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी मुद्रा बँक योजना आणि कौशल्य विकास या अनुषंगाने मुद्रा बँक योजनेचे राज्यातील समन्वयक आलोक गुप्ता यांनी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील माहिती देणारे सादरीकरण केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget