मंत्रिमंडळ निर्णय ( 11 डिसेंबर 2018) - शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना बेबी केअर कीट

मुंबई (११ डिसेंबर २०१८) : राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा लाभ पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे.

बालमृत्यू रोखण्यासाठी विविध विकसित देश अनेकविध उपाययोजना करीत असतात. त्यामध्ये बेबी केअर कीट पुरविण्यास ते प्राथम्य देतात. आंध्रप्रदेश, तामिळनाडू व तेलंगणा ही राज्ये नवजात बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करुन देत असल्याने बालमुत्यूचे प्रमाण रोखण्यास त्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. राज्यात सर्वसाधारणपणे वर्षाला वीस लाख महिला प्रसूत होत असतात. त्यापैकी आठ लाख महिला शहरी भागात व बारा लाख महिला आदिवासी-ग्रामीण भागातील असतात. त्यापैकी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात प्रसुती होणाऱ्या महिलांची संख्या दहा लाखाच्या आसपास आहे. त्यामध्ये पहिल्या प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या सर्वसाधारणपणे चार लाखाच्या आसपास आहे. नवजात बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी काही आवश्यक वस्तुंचा पुरवठा झाल्यास बालमुत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य होते. बेबी कीट योजनेंतर्गत पहिल्या प्रसुतीवेळी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र-शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या गर्भवतीने नवव्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेला माहिती किंवा अर्ज दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून संबंधित लाभार्थ्यांना बेबी केअर कीट बॅग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच एखाद्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत अर्ज सादर केल्यास तिला बेबी केअर कीट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण अथवा नागरी यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यापासून 3 दिवसात बेबी केअर कीट बॅग लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दोन हजार रुपये किंमतीच्या या कीटमध्ये लहान मुलांचे कपडे, प्लास्टिक लंगोट, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, थर्मामिटर, अंगाला लावावयाचे तेल, मच्छरदाणी, गरम ब्लँकेट, प्लास्टिकची लहान चटई, शॅम्पू, खेळणी-खुळखुळा, नखे काढण्यासाठी नेलकटर, हात मोजे व पाय मोजे, मुलाच्या आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, मुलाला बांधून ठेवण्यासाठी कापड आणि आईसाठी लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्वीड आदी साहित्याचा समावेश असेल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget