भोसला सैनिकी शाळेच्या 23 व्या वार्षिक समारंभाचे आयोजन

नागपूर (५ जानेवारी २०१८): सैनिकी शिक्षणाद्वारे शिस्तबद्ध नागरिक घडतो. समाजसेवा व देशभक्तीची मूल्य जोपासत देशाचे उज्ज्वल भवितव्य युवकांनी घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
भोसला सैनिकी शाळेच्या 23 व्या वार्षिक समारंभाचे आयोजन कस्तुरचंद पार्क मैदान येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लेफ्टनंट जनरल पी. बी. शेकटकर, प्रा.दिलीप बेळगावकर, सूर्यरतन डागा, कुमार काळे, शैलेश जोगळेकर, मधुलिका रावत, कर्नल जे.एस. भंडारी (नि.)उपस्थित होते.
प्रारंभी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्विकारली. त्यानंतर जिमनॅस्टिक, एअरोमॉडेलिंग शो, घोडेस्वारी, लेझीम, भालाफेक, बॅंडपथक यासह विविध प्रात्यक्षिके सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भोसला मिलिटरी स्कूलसाठी वार्षिक समारंभ हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. सैनिकी शिक्षण देणारी भोसला मिलीटरी स्कूल ही दर्जेदार शाळा असून सैनिकी शिक्षणाचे महत्त्व या संस्थेने रुजवले आहे. शिस्तबद्ध नागरिक घडविणे हाच यामागील उद्देश आहे.
लष्करप्रमुखांचे या कार्यक्रमातील मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. सर्जिकल स्ट्राईक तसेच अन्य माध्यमांतूनही आपण आपल्या देशाच्या सेनेची ताकद किती मोठी आहे, याचा अनुभव घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देशाच्या विविध क्षेत्रातील प्रगतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज विविध क्षेत्रात देश प्रगती करत असून आगामी पंधरा वर्ष देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. भारताची विविध क्षेत्रातील प्रगतीची घौडदौड यापुढे कोणीही रोखू शकणार नाही. आगामी काळात जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर देशाची वाटचाल सुरु असून युवाशक्ती ही देशाची मोठी ताकद आहे. देशासाठी समर्पण भाव ठेवून देशसेवेची संधी कोणीही दवडू नये. शिस्तबद्ध युवकच देशाचे भवितव्य घडवतील. देशाचे उज्ज्वल भवितव्य विद्यार्थ्याच्याच हाती असून समाजसेवा, देशसेवा आणि सैनिकी मूल्यांची जोपासना होणे गरजेचे असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत म्हणाले, सैनिकी शिक्षणामध्ये भोसला मिलिटरी स्कूलचे योगदान मोलाचे आहे. देशाचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हाती असून त्यांनी सक्षमतेने देश घडविण्याचा वारसा पुढे न्यावा. सैनिकी शिक्षण घेण्याची संधी मिळणे हे भाग्याचे असून विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी हा महत्त्वाचा पाया ठरेल. देशाला महान व्यक्तिमत्वांची परंपरा लाभली असून विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी. कठोर परिश्रम हाच यशाचा पाया आहे. आजचे युग झपाट्याने बदलणारे असून सर्वच क्षेत्रात सोशल मीडियाचे प्राबल्य वाढले आहे. हे माध्यम उपयुक्त आहे. मात्र याचा वापर सजगतेने करावा. भारतीय सेना एकमेवाव्दितीय असून विद्यार्थ्यांनी सेनेत दाखल होण्याचे आवाहन रावत यांनी केले. शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget