महामंडळामार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची कार्यवाही सुरु

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा खुलासा

मुंबई (३ जानेवारी २०१९) : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या परिसरात मृत बिबटया, सांबर आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर महामंडळामार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे महामंडळाने केलेल्या खुलाशात म्हटले आहे.
महामंडळाच्या अंतर्गत परिसरात 2 पाडे असून 5 पाडे महामंडळाच्या परिसराच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे चित्रीकरणाशी संबंधित व्यक्तिशिवाय इतर व्यक्तींनाही महामंडळाच्या परिसरात प्रवेश द्यावा लागतो. महामंडळाचा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे त्यामुळे बिबटे व अन्यजीव येथे संचार करीत असतात. मानव अणि वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने महामंडळाच्या परिसरात वन विभागाचे कर्मचारी अधूनमधून गस्त घालतात. तसेच महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेमार्फतही या परिसराची काळजी घेण्यात येते. चित्रनगरी महामंडळाचे 17 आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 107 असे एकूण 124 सुरक्षा रक्षक येथे तैनात आहेत.
वन्य जीवांची काळजी घेण्यासंदर्भात वन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार महामंडळाकडून नियमित कार्यवाही करण्यात येत आहे. चित्रीकरण संस्थांना सेटवरील ओला कचरा/शिल्लक राहिलेले अन्न यांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात लेखी सूचना आरक्षणाच्या वेळीच देण्यात येतात. तसेच महामंडळाच्या परिसरात चित्रीकरणासाठी येणाऱ्या चित्रीकरण संस्थांकडून निर्माण होणारा ओला कचरा एकत्रित करण्यासाठी महामंडळादवारे वाहनव्यवस्था करण्यात आली आहे.
महामंडळामार्फत परिसरात प्रवेश करताना अभ्यागतांची कडेकोट तपासणी, चित्रीकरण स्थळांच्या आजूबाजूला निर्मिती संस्थेकडून करण्यात येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या संबंधित निर्मिती संस्थेविरुध्द दंडात्मक कारवाई करणे, वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी महामंडळाच्या परिसराची विभागणी करुन प्रत्येक विभागात 1 सुरक्षा रक्षक तैनात करणे, वन विभागाकडून/वन विभागासह नियतकालिक पहाणी करणे अशा प्रतिबंधात्मक उपाय योजना वन विभागाच्या सूचनेनुसार करण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात अनूचित घटना येथे घडू नये यासाठी वन विभागाच्या सहकार्याने चित्रनगरी महामंडळाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. चित्रनगरी अंतर्गत असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून त्याला मंजूरी मिळाल्यास या क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप नियंत्रणामध्ये राहील. याशिवाय महामंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीमेलगत सुरक्षाभिंतीचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. हेलिपॅड ते व्हिसलिंगवूड मैदान या परिसराची सुरक्षा भिंत बांधण्यासाठी महामंडळाला तांत्रिक मंजूरी मिळाली असून निविदा प्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरु आहे. व्हिसलिंगवूड मैदान ते संतोष नगर पर्यंत भिंत बांधण्याचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला असून या याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. याबरोबरच सुरक्षा भिंतींचे काम पूर्ण झाल्यावर आरे तसेच रॉयल पाम बाजूने कोणीही अनधिकृत पध्दतीने प्रवेश करणार नाही, तसेच वन्य प्राण्यांच्या संचारासही प्रतिबंध बसणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget