स्नेहल भाटकर यांचे संगीत क्षेत्राला दिलेले योगदान महत्वपूर्ण - विनोद तावडे

मुंबई (१६ जानेवारी २०१९): महाराष्ट्राचे ज्येष्ठ संगीतकार तथा भजन सम्राट म्हणून आपल्या सर्वांना परिचित असलेले स्नेहल भाटकर यांनी संगीत क्षेत्राला दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या अविट गोडीच्या गाण्यांची नवीन पिढीला ओळख व्हावी या हेतूने 'स्वर स्नेहल' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.

स्नेहल भाटकर जन्मशताब्दी सोहळयानिमित्त आज दीनानाथ नाटयमंदिर येथे स्वर स्नेहल हा सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महापौर विश्वनाथ महाडेशवर, आमदार सदस्य पराग अळवणी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गायक रवींद्र साठे, स्वर स्नेहल कार्यक्रमाचे संयोजक अशोक हांडे, स्नेहल भाटकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते कै.स्नेहल भाटकर यांना आदरांजली म्हणून कुटुंबियांचा पुस्तक आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी तावडे यांनी ग. दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांसह स्नेहल भाटकर आणि कैफी आझमी अशा दोन ज्येष्ठ कलाकारांचे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय साजरा करणार असल्याची माहिती दिली.

स्वर स्नेहल या कार्यक्रमादवारे स्नेहल भाटकर यांची संगीतमय जीवनगाथा रसिकांसमोर मांडण्यात आली. या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशोक हांडे यांनी केले होते तर या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन रमेश भाटकर यांनी केले. संगीत संयोजन महेश खानोलकर यांनी केले होते. थोर संगीतकार स्नेहल भाटकर(१७ जुलै १९१९ ते १६ जुलै २०१९) यांचे जन्मशताब्दी वर्ष असून मराठी माणसाची मान उंचावणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला आदरांजली वाहण्यासाठी १६ जुलै २०१८ पासून यंदाचे वर्ष महाराष्ट्र शासन त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा करीत आहे. याच संकल्पनेतून पहिला कार्यक्रम आज दीनानाथ नाट्यमंदिर येथे सादर करण्यात आला.

स्नेहल भाटकर यांनी भजनं, भारुडं, गवळणी, अभंग, नाट्यगीते, मराठी चित्रपट गीते, हिंदी चित्रपट गीते, संगीतिका यामध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. झुबेन मेहता यांचे वडील मेहली मेहता सोबत पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचे पाहिले फ्यूजन गाणारा हा कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. स्नेहल भाटकर यांचे काम आणि त्यांनी भक्ती संगीतात केलेली अतुल्य कामगिरी पाहता त्यांच्या कलेचे संचीत आजच्या नवीन पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न राज्य शासन भजन संगीत आणि यांसारखे विविध सांस्कृतिक संगीत क्षेत्रातील स्पर्धा राबवून करणार असल्याचे यावेळी तावडे यांनी सांगितले.

संगीतकार म्हणून श्रेष्ठ असणारे माझे आजोबा माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. स्वर स्नेहल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या आजोबांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल कै.स्नेहल भाटकर यांचे नातू आणि रमेश भाटकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन भाटकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget