राजधानीत ‘महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सव’; गीत रामायणाने महोत्सवाची सुरुवात

नवी दिल्ली (१८ जानेवारी २०१९): प्रसिध्द गायक व संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगूळकर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यावतीने आजपासून ‘महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सवास’ सुरुवात होत आहे. ‘गीत रामायणा’ने या महोत्सवाचा प्रारंभ होत आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात अढळ स्थान निर्माण करणारे सुधीर फडके, ग.दि.माडगूळकर आणि पु.ल.देशपांडे यांचे 2019 हे जन्मशताब्दीवर्ष महाराष्ट्रासह देश-विदेशात साजरे होत आहे. याचेच औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यावतीने येथील जनपथ रोड स्थित डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान ‘महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

गीत रामायण, नाटक व चित्रपटाची खास मेजवानी या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रंगनिषाद प्रस्तुत ‘गीत
रामायण’ कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. ‘गीत रामायण’ ही ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांची कलाकृती आजही मराठी मनावर अधिराज्य गाजवित आहे. सुधीर फडके यांचे पूत्र प्रसिध्द गायक व संगीतकार श्रीधर फडके स्वत: गीत रामायण सादर करणार आहेत.

महोत्सवाच्या दुस-या दिवशी आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांच्या निवडक कलाकृतींवर आधारित ‘आम्ही आणि आमचे बाप’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. आदि कल्चरटेनमेंट आणि अष्टविनायक निर्मित या नाटकात अतुल परचुरे, अजित परब, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महोत्सावाचा समारोप नुकताच प्रसिध्द झालेल्या ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या पु.ल.देशपांडे यांच्या जीवनावरील चित्रपटाने होणार आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. पहिल्या दोन्ही दिवासांचे कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सुरु होणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी नि:शुल्क खुला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget