सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाची चित्रपट कलाकारांनाही भुरळ

मुंबई (४ जानेवारी २०१९) : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलची बॉलिवूड तारे-तारकांनाही भुरळ पडली आहे. चित्रपट अभिनेते शेखर सुमन, अर्चना पुरणसिंग यांच्यासह सहकलाकारांनी आज सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलला भेट दिली. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी कलाकारांचे स्वागत केले. चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

दत्त जयंती पासून देशातील सर्वात मोठ्या घोडेबाजाराला सारंगखेडा येथे सुरुवात झाली आहे. या बाजाराला पर्यटन विभाग तीन वर्षापासून अश्व पर्यटनस्थळ म्हणून विकसित करीत आहे.

अभिनेते शेखर सुमन, अर्चना पुरणसिंग, अली फजल, परमित शेट्टी यांनी शुक्रवारी चेतक फेस्टिव्हलला भेट देत घोडे बाजाराची माहिती घेतली. चेतक फेस्टिव्हलमध्ये सुरु असलेल्या टेंट पेगिंग स्पर्धेत सहभागी संघांच्या अश्व कसरती पाहिल्या. चेतक फेस्टिव्हल अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनाला त्यांनी भेट देऊन चित्रदालनाची पाहणी केली. त्याचसोबत या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टेंट सिटीत काही काळ घालवून जलक्रीडा आणि नौका विहाराचा आनंद घेतला. चेतक फेस्टिव्हलमध्ये पर्यटनासाठी उभारण्यात आलेल्या विविध ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. उपस्थित अश्वप्रेमी आणि भाविक यांच्याशी संवाद साधला.

पर्यटन विभाग चेतक फेस्टिव्हलची बांधणी करीत असून या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात यश आले आहे. या फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि इतर क्षेत्रातील मान्यवर येतील. मोठ्या प्रमाणात अशा फेस्टिव्हलच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळत असून अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळू शकते. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात घोडे प्रथमच पाहिल्याचे शेखर सुमन यांनी सांगितले. चित्रपटात एखादा घोड्यावरील अभिनय करताना अनेक वेळा रिटेक घ्यावा लागतो. मात्र या ठिकाणी घोड्याचा थ्रिल अनुभवण्यात वेगळीच मजा असल्याची प्रतिक्रिया शेखर सुमन यांनी दिली. हिवाळी पर्यटनासाठी नागरिक बाहेर देशात किवा पर्यटनस्थळावर जातात. मात्र सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल आणि या ठिकाणी उभारण्यात आलेली टेंट सिटी, घोडे बाजार, या ठिकाणी होणाऱ्या घोड्यांच्या विविध स्पर्धा ही पर्यटकांसाठी पर्वणी असेल. त्यामुळे पुढील वर्षी सर्वांनी चेतक फेस्टिव्हलला भेट द्यावी. मी सुद्धा पुढील वर्षी चेतक फेस्टिव्हलसाठी येणार आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता अली फजल यांनी दिली पर्यटन विभाग आणि चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन विकास होत आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटकांना एक नवीन ठिकाण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना एक वेगळी अनुभुती याठिकाणी मिळते, असे अर्चना पुरणसिंग यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget