‘खेलो इंडिया’चा 9 जानेवारीपासून शुभारंभ


मुंबई ( ७ जानेवारी २०१९ ): महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेचे यजमानपद मिळणे हा महाराष्ट्रासाठी गौरव असून यामुळे महाराष्ट्रात एक मोठा क्रीडा महोत्सव आयोजित होत आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी तसेच चांगले गुण मिळवावे यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना 15 दिवसांचे विशेष प्रशिक्षण त्या त्या खेळाच्या मार्गदर्शकाकडून देण्यात आल्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.

बॉम्बे जिमखाना येथे खेलो इंडिया स्पर्धेबाबतची माहिती पत्रकारांना देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला क्रीडा उपसचिव राजेंद्र पवार, नेमबाज तेजस्विनी सावंत, ॲथलिट रचिता मिस्त्री उपस्थित होते.

तावडे यावेळी म्हणाले, हॉकी स्पर्धेचे सामने मुंबईत होणार असून आजपासून हे सामने सुरु झाले आहेत. खेलो इंडियाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक मोठा क्रीडा महोत्सव आयोजित होत आहे. या क्रीडा महोत्सवातून अनेक खेळांना चालना मिळेल, भावी खेळाडू घडतील आणि क्रीडा संस्कृती बळकट होण्यास मदत होण्यास आहे. खेलो इंडिया आता शालेय स्तरावरून युवा स्पर्धापर्यंत पोहोचत आहे. खेलो इंडिया स्पर्धा ९ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत होणार असून यात देशभरातून जवळपास 9 हजार खेळाडू, संघ व्यवस्थापक/मार्गदर्शक पंच/तांत्रिक अधिकारी/स्वयंसेवक असे मिळून जवळपास 4 हजार, असे एकूण 13 हजार लोक यामध्ये सहभागी होणार आहेत. खेलो इंडिया स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळणे ही मोठी बाब असून आपण सर्वांनी मिळून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

खेळाडूंची व्यवस्था हॉटेलमध्ये या स्पर्धेचा मुख्य कणा हे खेळाडू आहेत. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होणार नाही याला प्राधान्य देऊन खेळाडूंची व्यवस्था शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या जवळील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे जवळपास 954 खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत.

खेळातही होऊ शकते करिअर...
आज पालक मुलांना खेळामध्ये करीअर करु देण्यास सहज तयार होत नाही. पण आज विद्यार्थ्यांनी खेळात चांगले प्रावीण्य मिळविले तर तो विद्यार्थी भविष्यात खेळामध्येच चांगले करीअर करु शकतो. आज महाराष्ट्रात चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी राज्य सरकार क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याबरोबरच खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार शासकीय सेवेत थेट नियुक्तीही देण्यात येत आहे. राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि अन्य क्षेत्रातही नोकरीत 5 टक्के आरक्षण अग्रक्रम देण्यात येत आहे.

‘खेलो इंडिया’त 18 खेळ
गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी खेलो इंडिया उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष आहे.खेलो इंडिया स्पर्धा पुण्यात ८ ते २० जानेवारी या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 18 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस जिम्नॅस्टिक्स, ज्युडो, नेमबाजी, जलतरण, टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल असे खेळ यामध्ये असतील.

आठवड्यातील एक संध्याकाळ साजरी करुया नो गॅझेट डे..
व्हिडिओ गेम छोडो, मैदान से नाता जोडो असे आपण म्हणताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना गॅझेटपासून दूर करणे आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी गॅझेटवर कमी आणि मैदानात जास्त वेळ घालविणे आवश्यक आहे. आज खेळामध्येही चांगले करीअर होऊ शकते हे लक्षात घेऊन खेळाला महत्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळांनी आणि पालकांनी सुध्दा आपल्या मुलांनी आठवड्यातील एक संध्याकाळ नो गॅझेट डे म्हणून साजरा करावे, असे आवाहन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री तावडे यांनी यावेळी केले.

10 जानेवारीला ओपन बोर्डाची लिंक देण्यात येणार
शिक्षण प्रवाहापासून दूर गेलेल्या आणि शारीरिक क्षमतांमुळे शाळेत पोहोचू न शकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यामध्ये सहभाग घेत असताना त्याच दिवशी आलेल्या परीक्षांमुळे सहभागी होण्यास अडचण येत असते. आता अशा विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मुक्त मंडळाची अर्थात ओपन बोर्डाची स्थापना करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या स्पर्धा/कार्यक्रम करुन शिक्षण पूर्ण करता येणार आहे. येत्या 10 जानेवारीला ओपन बोर्डाबाबतची लिंक देण्यात येणार आहे.
यावेळी नेमबाज तेजस्विनी सावंत आणि ॲथलीट रचिता मिस्त्री यांनी या स्पर्धेबाबत आपली भूमिका यावेळी नमूद केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget