लहान मुलांच्या लठ्ठपणावर वेळीच उपचार होणे आवश्यक शस्त्रक्रीयेची आवश्यकता भासल्यास शासन मदत करेल - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई (४ जानेवारी २०१९) : शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही लहानमुलांच्या लठ्ठपणाची समस्या गंभीर होत असून यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी प्रबोधनासाठी तसेच ज्या बाल रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना आवश्यकता भासल्यास शासनातर्फे सामाजिक दायित्वनिधी अंतर्गत मदत मिळवून देण्यात येईल असे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे सांगितले. राज्य शासनामार्फत ‘फाईट ओबेसिटी’ या उपक्रमांतर्गत लठ्ठपणाच्या समस्येवर सातत्याने काम करण्यात येत आहे. या अंतर्गतच लहानमुलांच्या लठ्ठपणावर लक्ष केंद्रीत करून काम करण्यात येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोरुडे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे आज अनावरण करण्यात आले, त्यावेळी श्री. महाजन बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते अमिर खान उपस्थित होते.


महाजन पुढे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार सुमारे 22 टक्के लहान मुलं ही लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या पद्धती, बदललेली जीवन शैली आणि काही वेळा परिवारातील जीन्स मुळे लठ्ठपणा संभवतो. त्याचा दुष्परिणामाने हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार बळावतात. दिवसेंदिवस मोबाईलच्या वाढलेल्या वापरामुळे मुलं मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. शारीरिक व्यायाम न मिळाल्याने लठ्ठपणा वाढतो आहे. डॉ. बोरुडे यांच्या उपक्रमामुळे देशातीलच नव्हे तर जगातील मुलांच्या आरोग्यासाठी शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध झाली आहे.

यावेळी सिनेअभिनेते अमिर खान म्हणाले, आपल्या देशात एकीकडे लहान मुलांच्या कुपोषणाची समस्या वाढलेली आहे, तर त्याचवेळी लहान मुलांमधील चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढलेली लठ्ठपणाची समस्या आहे. डॉ. बोरुडे यांनी सुरु केलेल्या उपक्रमातून या समस्येवर उपचार करता येणार आहेत. लहान मुलांवर उपचार करणे अवघड आहे, त्यांच्यासाठी शस्त्रक्रीया करून वजन कमी करणे हा शेवटचा उपाय ठरतो. मनाशी निश्चय केला तर कोणालाही वजन कमी करणे शक्य आहे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वतः पाच महिन्यात फॅट लॉस केला असल्याचे श्री. खान यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

लठ्ठपणाच्या समस्येला समुळ नष्ट करायचे असल्यास लहान मुलांच्या लठ्ठपणावर काम करणे आवश्यक असल्याचे डॉ. संजय बोरुडे यांनी सांगितले,ते म्हणाले, लहानमुलांच्या लठ्ठपणावर काम करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या वेबसाईट व इतर उपक्रमांतर्गत जनजागृती तसेच तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत.

शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे चाईल्ड ओबेसिटी सपोर्ट टिम (COST) तयार करण्यात आली आहे. www.childobesity.in या संकेतेस्थळाचे यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वैद्यकीय शिक्षाण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget