कला प्रदर्शन हे भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविष्कार - रवींद्र वायकर

मुंबई ( ८ जानेवारी २०१९ ): महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन म्हणजे राज्य तसेच भारतीय कला आणि संस्कृतीचा एक प्रसन्न अविष्कार आहे. कला प्रदर्शनात सादर होणाऱ्या कलाकारांच्या कलाकृतींमध्ये आशय तर आहेच पण त्यांचे सादरीकरण देखील अद्भुत शैलींद्वारे व्यक्त झाले आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सांगितले.

येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, प्रभारी कला संचालक आणि सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा आदी उपस्थित होते.

वायकर यावेळी म्हणाले, भविष्यातील नवीन पिढीपर्यंत महाराष्ट्राची कला पोहचविण्यासाठी या नवीन पिढीने आपल्या सांस्कृतिक कलांचे संवर्धन केले पाहिजे. आजच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबत कलेचेही ज्ञान असणे गरजेचे आहे यासाठी कलाविषय आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ठ झाला पाहिजे.

एकाचवेळी सुमारे तीनशेंहून अधिक कलाकारांच्या कलाकृती जहांगीर कलादालनाच्या सर्व दालनांमध्ये बघण्याची संधी म्हणजे कला विद्यार्थी, व्यावसायिक कलाकार, हौशी कलाकार, कला रसिक आणि कला संग्राहकांसह कलाकृती खरेदी करणाऱ्यांना अनोखी पर्वणी आहे. महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन सन १९५६ पासून कला संचालनालयामार्फत करण्यात येते. यावेळी श्री. वायकर यांच्या हस्ते राज्य कला संचालनालयाच्या स्मरणिकेचे अनावरण तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार डॉ. प्रभाकर कोलते यांचा सत्कार करण्यात आला.

चित्रकला, शिल्पकला, अप्लाईड आर्ट, ग्राफिक आणि दिव्यांग अशा एकूण १५ विविध विषयातील कलाकार विजेत्यांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले. या प्रदर्शनात सुमारे ३०० च्या आसपास कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. त्यातूनच परीक्षकांनी निवडलेल्या सर्व विभागातील मिळून एकूण पंधरा कलाकृतींना रोख दहा हजार रुपयाप्रमाणे पारितोषिके प्रदान करण्यात आली.

17 जानेवारी पर्यंत चालणारे हे कला प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget