खेलो इंडीया २०१९ चे शानदार उद्घाटन

पुणे ( ९ जानेवारी २०१९ ): युवकांसाठी खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन करून केंद्र सरकार स्वामी विवेकानदांच्या सुदृढ भारत निर्माणाचा मंत्र आचरणात आणत आहे. तीच प्रेरणा घेवून क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उंचाविण्यासाठी औंरगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये दुसऱ्या “खेलो इंडीया” २०१९ स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण मंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोड, पालकमंत्री गिरीश बापट, क्रीडा मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशील कुमार, स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडीयाच्या महासंचालक नीलम कपूर, क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, केंद्राचे क्रीडा सचिव राहूल भटनागर, साईचे उपमहासंचालक संदीप प्रधान उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात खेलो इंडियाचे आयोजन केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहे. स्वामी विवेकानंद युवकांना म्हणाले होते मंदिरात जाण्याऐवजी फुटबॉलच्या मैदानावर जाऊन खेळा. ज्या प्रमाणे देवाला सुकलेली फुले चालत नाहीत, त्याच प्रमाणे तंदुरूस्त नसलेले युवक मातृभूमीला चालत नाहीत. सुदृढ युवकांच्या माध्यमातून स्वस्थ भारताच्या निर्माणाचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न होते.
स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीचे आचरण सरकार करत आहे. त्यामाध्यमातून खेलो इंडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे युवा खेळाडूंना चांगला मंच मिळाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिभाशाली खेळाडू घडतील.
केंद्राच्या धर्तीवरच राज्य शासनानेही क्रीडा क्षेत्रात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, पूर्वी तालुकास्तरावर क्रीडा मैदानाच्या उभारणीसाठी १ कोटी रुपये दिले जात होते, ती रक्कम आता ५ कोटी रूपये केली आहे. तर विभागस्तरावरील मैदानासाठी २४ कोटी रूपयांच्या ऐवजी ४५ कोटी रूपये दिले जात आहेत. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठीच राज्य शासनाने ही पाऊले उचलली आहेत.
खेळात हार जीत तर होत असते असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेय यांची “ना हार मै, ना जीत मै” ही कविता उध्‌दगृत केली. तसेच खेळात हार जीतपेक्षा खेळाची उर्मी असणे आवश्यक आहे. हारू तर पुन्हा जिंकू, जिंकू तर पुन्हा पुढे जावू आणि पुढे जावू तर देशाचे नाव पुढे जाईल असे सांगत देशाचा तिरंगा उचावण्यासाठी खेळण्याचे आवाहन त्यांनी खेळाडूंना यावेळी केले.
खेलो इंडीया स्पर्धेतून ऑलंपिक विजेते तयार होतील – राजवर्धनसिंग राठोड कर्नल राजवर्धनसिंग राठोड म्हणाले, खेळासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे स्वागत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या मार्गदर्शनामुळे या दुसऱ्या खेलो इंडीया क्रीडा स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही मनापासून आभारी आहे. पुढच्या दहा दिवसात येथे होणाऱ्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण होणार असून या नव्या चॅम्पिअनला सर्व देश पाहणार आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. येथील विजेत्या खेळाडूंतून ऑलंपिक विजेते तयार होतील. खेळाच्या मैदानात मिळणारे शिक्षण कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. आजची पिढी मजबूत होण्यासाठी युवकांनी खेळण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश केंद्राचे क्रीडा सचिव राहूल भटनागर यांनी वाचून दाखविला. खेलो इंडीयाच्या “जय आणि विजय” या दोन्ही शुभंकरांनी मैदानात फेरी मारली. यावेळी खेळाडूंनी देशभराच्या प्रमुख शहरांची यात्रा करून आलेल्या खेलो इंडीयाची ज्योत मान्यवरांच्या हाती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी उपस्थितांना खेळा विषयी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली.

“लोकराज्य” विशेषांकाचे प्रकाशन
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्यच्या जानेवारी महिन्याच्या खेलो इंडीया विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोड, क्रीडा मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget