वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध १५ सामंजस्य करार

मुंबई ( १२ फेब्रुवारी २०१९ ) : सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाची दरी सांधण्यास खूप महत्व असून आज झालेले सामंजस्य करार हे त्या दिशेने टाकलेले एक शुभलक्षणी पाऊल आहे, अनेक संस्थांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्यासाठी दाखवलेली रुची ही निश्चित स्वागतार्ह असल्याचे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चला, सर्व मिळून काम करू महाराष्ट्राचा सर्वंकष विकास करू असे आवाहन देखील केले.

आज सह्याद्री अतिथीगृहात महापरिवर्तन: भागीदार विकासाचे” या कार्यक्रमांतर्गत वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत विविध संस्थांनी शासनाच्या विविध यंत्रणांबरोबर १५ सामंजस्य करार केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, डॉ. आनंद बंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आज केलेल्या सामंजस्य करारातून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करून मुनगंटीवार म्हणाले, जिथे अधिक लक्ष देण्याची गरज आहे अशाच क्षेत्रांच्या विकासाची निवड आज झालेल्या सामंजस्य करारात करण्यात आल्याचे दिसते. महिला सक्षमीकरण, मॉडेल अंगणवाड्यांची निर्मिती, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था, कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती, वन जमीनींचे वाटप करून सामुहिक वनव्यवस्थापनातून केलेला वन विकास ही सर्वच क्षेत्रे ग्रामीण महाराष्ट्राला अधिक सशक्त आणि बलवान करणारी आहेत. शासनासोबत या कामात विविध संस्था सहभागी झाल्याने हे काम अधिक उत्तमपद्धतीने पूर्णत्वाला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केलेल्या कामाचे विश्लेषण महत्वाचे ठरते, त्यामुळे कामातील उणिवा टाळून पुढच्या कामात यश मिळवता येते असे सांगून त्यांनी विकास प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व भागीदारांचे आभार व्यक्त केले.

आज झालेले सामंजस्य करारामध्ये टाटा ट्रस्ट ने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्यासमवेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून कुपोषण निर्मुलन आणि मॉडेल अंगणवाडींच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार केला. यात गडचिरोलीचे भामरागड आणि कुरखेडा हे दोन तालुके निवडण्यात आले आहेत तर चंद्रपूरचे जिवती, मुल आणि पोंभुर्णा हे तीन तालुके निवडण्यात आले आहेत. या सामंजस्य कराराद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख तर गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ४११ लाभार्थ्यांना लाभ मिळेल. मॅजिक बस आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराद्वारे चंद्रपूर येथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करण्यात येईल ज्याद्वारे शिक्षण आणि कौशल्य विकास यांची सांगड घालतांना नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. याद्वारे तीन वर्षात अतिरिक्त्‍ ७५ हजार मुलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यात शिक्षकांचे प्रशिक्षण हा घटक देखील महत्वाचा आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्यांचा विकास कसा करावयाचा हे सांगितले जाईल.

सेफ वॉटर नेटवर्क आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि गडचिरोली यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात १० वॉटर स्टेशन्स स्थापन करण्यात येतील जे स्वंयसहाय्यता बचतगटामार्फत चालवले जातील याचा दोन लाख लोकांना लाभ होईल तर गडचिरोली जिल्ह्यात ही शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी १० वॉटर स्टेशन्स स्थापन करण्यात येतील ज्याचा एक लाख लोकांना लाभ मिळेल. कम्युनिटी फॉरेस्ट राईटस् च्या प्रभावी अंमलबजावणीतून वनांचे जतन, संवर्धन करतांना आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने विभागीय आयुक्त अमरावती आणि नागपूर यांच्यात आज सीएफआरए” मॉडेलच्या अंमलबजावणीसाठी महत्वपूर्ण करार झाला. याशिवाय मुंबई- पुणे एक्सप्रेस वे च्या दोन्ही बाजूंनी २ लाख वृक्षलागवड, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करतांना टोल फ्री कॉन्फ्लीक्ट रिस्पाँन्स सिस्टीम विकसित करणे, ग्रामीण हेल्थकेअर, बांबू प्रमोशन, राज्यातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षलागवड अशा विविध विषयांवरही सामंजस्य करार करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget