देऊळगावराजा शहरातील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे थाटात लोकार्पण

बुलडाणा ( १४ फेब्रुवारी २०१९ ) : केंद्र सरकारच्‍या मदतीने छोटया शहरातील विविध विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. बालाजी नगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या देऊळगावराजा शहरातही अनेक विकासाची कामे करण्‍यात आली असून या शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मागील चार वर्षांत राज्‍य शासनाने मोठया शहरांबरोबरच लहान शहरांच्‍या विकासावरही प्रामुख्‍याने भर दिला आहे, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देऊळगांव राजा येथे केले.

देऊळगावराजा येथील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्‍यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्‍याहस्‍ते आज करण्ययात आले. त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महसुल राज्‍यमंत्री संजय राठोड, नगर विकास राज्‍यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा उमाताई तायडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार सर्वश्री डॉ संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, देऊळगावराजा नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा सुनिता शिंदे, उपाध्‍यक्ष प्रविण झोरे आदींसह नगर परिषद पदाधिकारी उपस्थित होते.


राज्‍यातील लहान शहरांचा विकास करीत असताना शासनाने या शहरांतील मुलभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्‍ध करुन दिला असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, सात हजार कोटींहून २१ हजार कोटी इतका निधी छोटया शहरांतील विकास कामांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. केंद्र सरकारच्‍या मदतीनेही नगर पालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास कामे करण्‍यात येत आहेत. रस्‍ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधांसाठी अभूतपूर्व निधी देण्‍यात आला आहे. यापुढेही प्रस्‍तावित केलेल्‍या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. बालाजीची नगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या देऊळगाव राजाच्‍या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्‍द आहे, अशी ग्‍वाहीही यावेळी मुख्‍यमंत्री यांनी दिली.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी म्‍हणाले की, देऊळगाव राजाच्‍या सु‍शोभिकरणासाठी सव्‍वा कोटी इतका निधी मंजूर करण्‍यात आला आहे. या शहराच्‍या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहराच्‍या विकासाचे जे काही प्रस्‍ताव असतील तेही मान्‍य करण्‍यात येतील. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नगराध्‍यक्षा सुनिता शिंदे यांनी केले.

देऊळगावराजा नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत सर्व सुविधांनीयुक्‍त सुसज्‍ज अशी बांधण्‍यात आली आहे. इमारत निर्माणासाठी 3 कोटी 20 लक्ष इतका निधी खर्च झाला आहे. वैशिष्‍टयपूर्ण निधी योजनेतून इमारतीचे बांधकाम करण्‍यात आले आहे. सर्व विभागांसाठी स्‍वतंत्र अशी व्‍यवस्‍था आहे. सुमारे 2308 चौ.मी. बांधकाम असून या भव्‍य इमारतीमुळे देऊळगावराजा शहराच्‍या वैभवात भर पडली आहे. कार्यक्रमाला नगर परिषद पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget