पालघर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही

भूकंपग्रस्त भागांत एनडीआरएफचे तंबू तैनात

पालघर ( २ फेब्रुवारी २०१९ ) : जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांमध्ये जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्यांमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रहिवाशांनी घराबाहेर झोपण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. यादृष्टीने त्यांच्या सोयीसाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून एनडीआरएफचे तंबू मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून शनिवारी या तंबूंचे संबंधित ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले आहे.

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या भागात रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत एनडीआरएफच्या टीमला पाचारण
करण्यात आल्यानंतर शनिवारी सकाळी पुणे येथून ही टीम दाखल झाली. त्यांच्यामार्फत भूकंपग्रस्त गावांमध्ये 200 तंबू उभारण्यात आले आहेत. सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी धुंदलवाडी येथे आढावा बैठक घेऊन आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतींना या तंबूंचे वाटप केले. डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग, तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे, सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या परिसरात राबविण्यात येत असलेल्या यंत्रणेबद्दल माहिती देताना कटियार म्हणाले, डहाणूमधील 15 आणि तलासरीमधील सात गावे भूकंपाच्या धक्यांमुळे प्रभावित झाली आहेत. या भूकंपाचे विश्लेषण करण्यासाठी नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैद्राबाद आणि दिल्ली येथून तज्ज्ञ दाखल झाले असून तीन ठिकाणी यासंबंधीची यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे. महसूल, आरोग्य, पेालीस, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी येथील परिस्थितीबाबत दक्ष आहेत. रहिवाशांच्या सोयीसाठी एनडीआरएफ च्या 200 तंबूंसह 70 ते 80 लोकांची सोय होईल असे आणखी मोठे तंबू लावले जात आहेत. विद्यार्थ्यांचीही सोय लक्षात घेऊन हे तंबू विशेषत: शाळा आणि आश्रमशाळांच्या आवारात लावले जात आहेत. याशिवाय 3 रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

भूकंपामुळे रात्री घराबाहेर झोपण्याचे आवाहन प्रशासनाने केल्याच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांमध्ये सुरक्षेची भावना राखण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलीस दल कार्यरत असून तलासरी पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकारी, पाच कर्मचारी आणि 11 जणांचे प्लाटून संपूर्ण परिसरात गस्त घालत असल्याची माहिती परिविक्षाधीन अधिकारी (भापोसे) श्रवण दत्त एस. तसेच पोलीस उपअधीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget