टँकरद्वारे नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ ब्रीजद्वारे प्रशासनास सूचना

मुंबई ( १४ मे २०१९ ) : दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणतीही तक्रार येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. तसेच दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना दिल्या.

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंचाशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला. या संवाद सेतूच्या माध्यमातून सुमारे 20 हुन अधिक सरपंचाच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. या सूचनांची नोंद स्थानिक प्रशासन घेत असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुखेड तालुक्यातील सरपंच ज्योती चव्हाण यांनी केलेल्या वाढीव टँकर व चारा छावणीच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये मागणीनुसार टँकर सुरू करावेत. तसेच जेथे वाढीव टँकरची मागणी आहे, त्या ठिकाणी पाहणी करून तत्काळ कार्यवाही करावी. आवश्यक तेथे चारा छावणी सुरू करण्यात यावी. मुखेड तालुक्यातील दत्तात्रय करणे, जगताप, मुकिंदा मारकवाड, बाबूराव दस्तुरे, लक्ष्मण पाटील, बालाजी पाटील या सरपंचांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सन 2018 च्या लोकसंख्येनुसार जनावरांची संख्या लक्षात घेऊन टँकर सुरू करण्यात यावेत. टँकरच्या फेऱ्या नियमित होतील, याकडे गट विकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात योग्य ती पावले प्रशासनाने उचलावीत. पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने मार्गी लावावीत. नांदेड जिल्ह्यात रोहयोतून सध्या 942 कामे सुरू असून 19 हजार 584 कामे शेल्फवर आहेत. त्यामुळे आवश्यक तेथे रोहयोची कामे सुरू करावीत. उमरी तालुक्यातील सुरेखा बालाजी डांगे, शिवाजी शंकर पांचाल या सरपंचांनीही गावातील दुष्काळसंबंधीत समस्यां मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सरपंचांनी केलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी. तसेच दुष्काळाशी संबंधित तक्रारी व सूचनांसाठी सरपंचांना व्हॉटसअप क्रमांक देण्यात आला आहे. त्यावरील तक्रारीचीही दखल घेऊन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत.

नांदेड जिल्ह्यासाठी केलेल्या उपाययोजना

नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर व उमरी या 3 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून तीनही तालुक्यातील गावांची संख्या 306 इतकी आहे. दुष्काळ घोषित केलेल्या मुखेड तालुक्यात 51 टँकर, देगलूर 2 टँकर उमरी तालुक्यामध्ये 1 टँकर सुरू आहे.

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ आज अखेर 11 विंधण विहिरी, 869 विहिरींचे व बोअरवेलचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची 1.83 कोटी रुपये इतक्या विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस वीज बिलापोटी देण्यात आली आहे व या योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

दीड लाख शेतकऱ्यांना 86.91 कोटींचा दुष्काळ निधी वाटप

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तीन तालुक्यातील 1 लाख 55 हजार 741 शेतकऱ्यांना 86.91 कोटी रुपये दुष्काळ निधीचे वाटप करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण 10 लाख 92 हजार 600 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. आतापर्यंत 37 हजार 378 इतक्या पात्र शेतकऱ्यांना 17.34 कोटी रुपयांची इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या ल 2.52 लाख शेतकऱ्यांपैकी 1.13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी एकूण 22.52 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 942 कामे सुरू असून त्यावर 13 हजार 512 मजूर काम करत आहेत. रोहयोमधून इतर 28 प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहेत.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget