धोरणात्मक नियोजनासाठी 'सीएम-फेलोज'ची निरीक्षणे महत्त्वपूर्ण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( १२ जून २०१९ ) : सीएम फेलोजच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणांमुळे योजनांसाठी चांगले धोरणात्मक नियोजन करणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

‘चीफ मिनिस्टर फेलोशीप प्रोग्रॅम' अंतर्गत 2018च्या बॅचमधील सीएम-फेलोजशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज येथे ‘इंटरअॅक्शन विथ सीएम फेलोज’ कार्यक्रमात संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी कार्यक्रम झाला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, फेलोजनी त्यांना दिलेल्या विषयांमधील संशोधनाअंती अभ्यासपूर्ण असे मुद्दे पुढे आणले आहेत. यात त्यांची मेहनतही दिसून येते. शिक्षण, महिला सक्षमीकरण, महिला आरोग्य, कृषी तसेच औद्योगिक आणि प्रकल्प पुनर्वसन, महिला व बाल कल्याण या क्षेत्रातील हे सर्व अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. यात विषयानुरूप अनेक अंगानी सुक्ष्म अभ्यास केल्याचेही दिसते. महिलांच्या आरोग्याच्या विषयावर विशेषतः मुलांमध्येही शैक्षणिक अभ्यासक्रमातून जाणीव-जागृती करण्याबाबतही प्रयत्न करता येतील.
महिलांच्या रोजगार संधीलाही चालना द्यावी लागेल. त्याशिवाय आर्थिक विकासाबाबतचे उद्द‍िष्ट साध्य करता येणार नाही. महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी महिला आयोगाला आणखी सक्षम करण्यासाठी निश्चितच प्रय़त्न केले जातील. विशेषतः महिलांबाबतच्या अनिष्ट अशा सामाजिक रुढी-प्रथांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, अॅप आदीचाही वापर करता येतील. बाल लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध घटकांची क्षमता बांधणीही केली जाईल. त्यासाठी सूक्ष्म असे नियोजन करता येईल.

फेलोजनी विविध विषयांवर अभ्यासातून महत्त्वपूर्ण अशी निरीक्षणे नोंदविली आहेत. या उपक्रमांमुळे फेलोजना लोकांशी सुसंवाद साधता येतो. यातून लोकांचा वेगळा दृष्टीकोन शासनापर्यंत पोहचतो. त्यामुळे आणखी चांगले धोरणात्मक निर्णय घेणे शक्य होते, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

सीएम फेलोजनी त्यांना अभ्यासासाठी दिलेल्या विविध प्रकल्प-योजनांबाबतचे अहवाल सादर केले. खान यांनी प्रास्ताविक केले व विविध अभ्यास प्रकल्पांची माहिती दिली.

याप्रसंगी वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, कौस्तुभ धवसे, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक र. र. शिंगे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget