विधानपरिषद लक्षवेधी : बृहन्मुंबई मनपाची सर्व रुग्णालये सुस्थितीत राहण्यासाठी उपाययोजना - योगेश सागर

मुंबई ( १९ जून २०१९ ) : बृहन्मुंबई महापालिकेची सर्व रुग्णालये सुस्थितीत राहतील व त्यांच्यामार्फत रुग्णांना दर्जेदार सेवा मिळतील, यासाठी राज्य शासन व महापालिका उपाययोजना करत असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

मुंबई महापालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालये यासंदर्भात सदस्य विद्या चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सागर बोलत होते.

यावेळी सागर म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेची 4 वैद्यकीय महाविद्यालये, त्यांच्याशी संलग्न प्रमुख रुग्णालये, 1 दंत महाविद्यालय, 16 उपनगरीय रुग्णालये व 5 विशेष रुग्णालये व 175 दवाखाने कार्यरत आहेत. या वैद्यकीय संस्थांमध्ये 1886 निवासी वैद्यकीय अधिकारी, 787 प्रबंधक, 769 आवास अधिकारी, 221 प्राध्यापक, 366 सहयोगी प्राध्यापक, 644 सहाय्यक प्राध्यापक, 1436 वैद्यकीय अधिकारी, 520 विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार/मानसेवी सहाय्यक आणि 334 बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेकरिता कार्यरत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी 550 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. सदरहू शिकाऊ डॉक्टर्स प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेकरिता उपलब्ध असतात.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील शस्त्रक्रियागाराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण अधिक प्रभावी व्हावे
याकरिता ‘रुग्णालय जंतुसंक्रमण नियंत्रण समिती’ व विविध विभागातील मानसेवी तज्ज्ञांची बैठक घेऊन समितीने सुचविलेले उपाय अंमलात आणण्याची कार्यवाही विविध स्तरांवर सुरु आहे. शस्त्रक्रियागारातील कार्यरत बहुउद्देशीय कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील सेवेचा दर्जा उत्तम रहावा याकरिता सिव्हील, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल बाबींच्या परिरक्षणासाठी ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व‍िसेस’ उपलब्ध करुन देण्याचे महानगरपालिकेने योजिले आहे. या सर्विसेसद्वारे महानगरपालिकेची रुग्णालये स्वच्छ व दर्जेदार राहण्यास मदत होईल. तसेच मुंबईत रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसुविधासाठीही शासन प्रयत्नशील आहे.

या चर्चेत सदस्य सर्वश्री किरण पावसकर, प्रसाद लाड, हेमंत टकले आदी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget