स्थलांतरित पक्ष्यांची माहिती देणार "बर्ड बॅण्ड"

मुंबई ( ३ जून २०१९ ) : कांदळवन प्रतिष्ठान आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांनी सामान्य जनतेसाठी "बर्ड बॅण्ड"नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. या अंतर्गत स्थालांतरीत पक्ष्यांची माहिती संपूर्ण देशभरातून एकत्रित केली जाणार असून या माहितीचा उपयोग स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी केला जाणार आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वन विभागाच्या अखत्यारितील कांदळवन कक्षाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैव विविधता केंद्रामध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींसह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात बर्ड बॅण्ड या मोबाईल ॲप्लीकेशनचे, शोभिवंत माशांच्या उबवण केंद्राचे उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात या ३६ सीटर बसचे लोकार्पण ही करण्यात येईल.

शोभिवंत मासे पालन व संवर्धन हे स्वंयरोजगाराचे एक उत्तम साधन झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन कांदळवन कक्षाने राष्ट्रीय मत्स्य अनुवंशिक संसाधन ब्युरो यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ऐरोली येथे शोभिवंत माशांचे उबवणी केंद्र उभारले आहे. या उबवणी केंद्रातून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या लाभार्थींना शोभिवंत माशांची पिल्ले देण्यात येतील व त्यांना या माशांच्या पालनातून शाश्वत उपजीविका कार्यक्रमात सामावून घेतले जाईल.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने "मरीन मॅटर्स" व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे व्याख्यानांचे आयोजन केले जाईल व यातून सागरी जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन यासंदर्भात व्यापक जनजागृती केली जाईल.

महाराष्ट्र वन विकास महामंडळाने सामाजिक दायित्व निधीतून ३६ सीटर बस कांदळवन प्रतिष्ठानला दिली आहे. या बसची सेवा शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रास भेट देण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. ५ जून २०१९ रोजी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन सागरी जैवविविधता संवर्धनात तसेच संरक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन ही वन विभागाने केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget