राज्यस्तरीय योग शिबिरात नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा...

नांदेड ( २१ जून २०१९ ) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला. या उत्साही वातावरणात सहभागी होवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाल्याचा आनंद नांदेडकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

नांदेड शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) येथे राज्यस्तरीय योग दिनासाठी मागील दहा दिवसापासून राज्य शासनाच्या विविध आस्थापना आणि पतजंली योगपीठाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम आज भल्या पहाटे दिसून आला. नांदेड शहरातील शिबिराकडे जाणारे

रस्ते वाहनांच्या व नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी युवक-युवती , महिला -पुरुष, अबाल वृध्द , शिक्षकवर्ग , विद्यार्थी असे शहरी, ग्रामीण भागातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग जाणवत होता. कार्यक्रम स्थळाकडे शिस्तबध्दरितीने लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या लोकांमध्ये उत्साह दिसून येत होता.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणातील महसूल, पोलीस, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, होमगार्ड, जिल्हा परिषद, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यासह विविध स्वंयसेवी संस्था व संघटना यांच्या स्वंयसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमस्थळी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या योग प्रात्यिक्षिकांना एका भव्यदिव्य सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पांढऱ्या शुभ्र पोषाखामधील लाखों नागरिक योगासनाचे विविध प्रकार करीत होते. प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, गोल्डन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचे निरीक्षण आणि वृत्तांकनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक क्षणाची नोंद घेत होते. विविध वृत्त वाहिन्यांद्वारे याचे थेट प्रसारण जगभरातील 177 देशातील नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सुरु असलेली लगबग जाणवत होती.

भारतीय परंपरेतील पाच हजार वर्षांपेक्षा जुन्या योग विद्येला आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त करुन देतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघातून योगदिन हा जगभरात साजरा केला जावा. या मांडलेल्या प्रस्तावाला जगातून 177 देशांनी पाठींबा दिला. हे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे सलग पाचवे वर्ष असल्याने राज्यस्तरीय शिबिराचा बहुमान नांदेड नगरीला प्राप्त झाल्याने हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवून आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती उत्साही दिसत होता.

सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये विविध भागातील जातीधर्मातील लोकांच्या मनामध्ये योगाबद्दल असलेली आस्था त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियातून जाणवली.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या पांगरा गावाच्या नंदाबाई कदम म्हणाल्या, शहरापासून दूर असूनही आमच्या खेडेगावात योगाबद्दल जनजागृती वाढत आहे. नियमितपणे योगासाने करणारी अनेकजण आहेत. त्यांना या भव्य योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती. परंतु सगळ्यांना येणे शक्य नसल्याने गावातील 50 महिला आणि पुरुषांचा चमू या कार्यक्रमासाठी आज येथे आलेला होता. येथील कार्यक्रम पाहून आनंद झाला असून त्याची माहिती आम्ही गावातील इतरांना देणार आहोत. असेही त्या म्हणाल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget