विधानपरिषद लक्षवेधी : प्राध्यापक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आल्यास सखोल चौकशी - रविंद्र वायकर

मुंबई ( २१ जून २०१९ ) : राज्यातील महाविद्यालयात प्राध्यापक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

राज्यातील अनुदानीत महाविद्यालयात सुरु असलेल्या प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना वायकर बोलत होते.

वायकर म्हणाले, राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य या संवर्गातील 100 टक्के रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्नित उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार 3580 सहाय्यक प्राध्यापक तसेच शारीरिक शिक्षण संचालक-139, ग्रंथपाल-163 व प्रयोगशाळा सहाय्यक-856 अशी एकूण 4738 पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली असून पदभरतीची प्रक्रिया राज्यामध्ये सुरु आहे. रिक्त पदे भरण्यापूर्वी बिंदूनामावलीनुसार आरक्षण निश्चिती करुन घेऊन त्यानुसार पदभरतीस ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. रिक्त पदे भरण्याकरीता आजपावेतो 119 संस्था/महाविद्यालयांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्यापैकी काही महाविद्यालयांनी जाहिराती देऊन भरतीची प्रक्रिया सुरु केलेली आहे. प्राध्यापक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार रोखण्यासाठी मुलाखतीचे व्हिडीओ चित्रिकरण करण्याबाबतचाही निर्णय घेतला जाईल.

प्राध्यापकांचे वेळेवर वेतन न देणाऱ्या शिक्षणसंस्थांवर कारवाई करु - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे

राज्यातील प्राध्यापकांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे. परंतु काही शिक्षणसंस्था चालक वेळेवर वेतन देत नाही अशा शिक्षणसंस्था चालकांची शासनाकडे तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

राज्यातील अनुदानित महाविद्यालयात सुरु असलेल्या प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचनेत प्राध्यापकांच्या वेतनाबाबतचा उपप्रश्न सदस्य सतीश चव्हाण यांनी मांडला होता, त्याला उत्तर देताना तावडे बोलत होते.

यावेळी तावडे म्हणाले, राज्यातील संपूर्ण प्राध्यापक भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मागदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यात येते. राज्यात प्राचार्य भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचार मुक्त केली जाईल. याबाबतच्या सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित सदस्यांची लवकरच संयुक्त बैठक घेतली जाईल.

या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री दत्तात्रय सावंत, भाई जगताप, नागोराव गारणार आदींनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget