मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍याहस्‍ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य" क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन

पुणे ( २३ जून २०१९ ) : पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम "स्वराज्य" या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवेकालीन नाना वाड्याचे पुनरुज्जीवन व "स्वराज्य" क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करून महापौर आणि नगरसेवक यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची कमी नाही. आपल्या देशाला 5000 वर्षांची संस्कृती आहे.

आपण आपल्या देशाचा इतिहास जतन केला पाहिजे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाणीतून त्या किल्ल्यांची माहिती ऐकण्याची पर्वणी असते. राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याचे काम राज्य शासनाने दोन वर्षापासून हाती घेतले आहे. रायगड किल्ल्याचे संपूर्णपणे संवर्धन केले जात आहे, तेथे झालेल्‍या उत्खननात अडीचशे पेक्षा अधिक साईट सापडल्या आहेत. त्यातून महाराजांचे दैदीप्यमान चित्र समाजापुढे उभे राहणार आहे. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा समाजापुढे आला नाही तर समाज ऊर्जावान होऊ शकत नाही, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन हा या शृंखलेतील एक भाग आहे. नाना वाड्यातील संग्रहालय ‘इतिहासाचं चालते बोलते पुस्तक’ असून या ठिकाणी दैदीप्यमान इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुणे महापालिकेच्यावतीने अशा पद्धतीने होणाऱ्या कामास राज्य सरकार पूर्ण मदत करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या बद्दलही मुख्‍यमंत्र्यांनी महापालिकेचे कौतुक केले.

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही थोडक्‍यात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. मी विद्यार्थी आहे, असे नम्रपणे नमूद करुन देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हाल-अपेष्‍टा सहन करणा-या एका तरी क्रांतीकारकाचे चरित्र पूर्णपणे वाचावे, असे आवाहन केले. ‘मुक्‍या मनाने किती उधळावे शब्‍दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढचे तोफांचे चौघडे’ या काव्‍यातून समर्पकपणे आपल्‍या भावना मांडल्या.

खासदार गिरीश बापट यांनी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम असल्‍याचे सांगितले. पुणे शहराला सांस्‍कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, औद्योगिक वारसा असल्‍याचा उल्‍लेख करुन स्‍मार्ट सिटीच्‍या माध्‍यमातून पुणे शहराला आदर्श शहर बनविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. नाना वाड्यातील संग्रहालयामुळे आजच्‍या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन आपला इतिहास न विसरण्‍याचे नागरिकांना आवाहन केले.

महापौर मुक्‍ता टिळक यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात या संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून नानावाडा ही वर्ग एक दर्जाची ऐतिहासिक वास्तू असल्‍याचे सांगितले. सन 1740 ते 1750 या कालावधीत पेशव्यांचे मंत्री
असलेल्या नाना फडणवीसांनी हा वाडा बांधून घेतला. या वाड्याचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार चौ.मी. आहे. या वाड्यामध्ये ब्रिटीशकालीन दगडी इमारत आणि एल आकारातील मूळ पेशवाई वास्तू यांचा समावेश आहे.

सागवानी लाकडात बनवलेल्या तुळ्या, दगडी खांब, दुर्मिळ मेघडंबरी, नाजूक कलाकुसर असलेले फॉलसिलींग, दिवाणखाना, दुर्मिळ भीत्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्‍ट्य जतन करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या वाड्यात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणा-या क्रांतीकारकांची माहिती असणारे संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये तळमजल्यावर असलेल्या अकरा खोल्यात स्वागत कक्ष, उमाजी नाईक, वासूदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद या क्रांतिकारकांचे तसेच 1857 चे युध्‍द, आदिवासींचा उठाव, नेमस्तांची चळवळ, बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, जोतिबा-सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या समाजसुधारकांचे जीवन चरित्र यामध्ये दर्शविण्यात आले आहे. उद्घाटनापूर्वी मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी या संग्रहालयाला भेट देऊन पहाणी केली.

कार्यक्रमास स्‍थायी समिती अध्‍यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, राजेश येनपुरे, गायत्री खडके, तसेच नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget