कडू लिंब रोप वाटपाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद

पुणे( २३ जून २०१९ ) : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” हे अभियान महत्वपूर्ण असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेल्याचे सांगत यामध्ये सहभागी झालेले सर्वजण इतिहास बनले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी” अभियानाच्या महासंकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, आमदार दिलीप कांबळे, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष राजेश
पांडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पंढरपूरची वारी हा जगाच्या इतिहासात अभूतपूर्व उत्सव आहे. या वारीला सातशे वर्षाची परंपरा आहे. कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी मोठ्या भक्ती-भावाने या वारीत दरवर्षी सहभागी होतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची आस नसते, त्यांना केवळ पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता ते या वारीत सहभागी होतात. वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा करून ही वारी हरीत आणि निर्मल करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे हे अभियान निश्चितच महत्वाची भूमीका पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच वेळी मोठ्या संख्येने कडू लिंबाची रोपे लावण्याचा आणि त्याचे संवर्धन करण्याचा रेकॉर्ड गिनिज बुकमध्ये नोंद होत असल्याबद्दल सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी “ बाज की असली उडान अभी बाकी है... तुम्हारे इरादोंका इम्तिहान अभी बाकी है... अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन तुमने... अभी पुरा आस्मान बाकी है... अशा
शब्दात एनएसएस च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ज्या प्रमाणे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर स्वत:चे रेकॉर्ड स्वत:च मोडत होता, त्याच प्रमाणे आजचा तुमचा रेकॉर्ड तुम्हीच मोडा ,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ वारी-निर्मल वारी यशस्वी होणार आहे. आपल्या देशातील अनेक विषयांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. आजचा कडुनिंबाच्या रोपांचे वाटप करण्याचा हा रेकॉर्ड खूप महत्वाचा आहे. पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना शासनाच्यावतीने 5 लाख रेनकोटचे वाटप करण्यात येणार असून वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना महासंकल्प अभियानाची शपथ दिली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी समन्वयाची भूमीका पार पाडणाऱ्या मिलींद वार्लेकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी मानले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget