(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वृक्ष विठ्ठल… वृक्षपूजा विठ्ठल | मराठी १ नंबर बातम्या
" />

वृक्ष विठ्ठल… वृक्षपूजा विठ्ठल

धन मोठे की वन मोठे याचा वाद सुरु असतांना एकाने सांगितलं, श्वास बंद करून नोटा मोजत रहा, ते तुला करता आलं तर धन मोठे हे सिद्ध होईल, ज्याला धन मोठे वाटत होते त्याने श्वास बंद करून नोटा मोजायला सुरुवात केली… जेमतेम पाच मिनिटे तो श्वास बंद करून नोटा मोजत राहिला… त्यानंतर काही क्षणात धाप लागून त्यांने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं शक्य नाही… श्वासाशिवाय माणूस जगू शकणार नाही… तेंव्हा समोरची व्यक्ती म्हणाली, ज्या श्वासाशिवाय तू जगू शकत नाही तो श्वास, तो ऑक्सीजन झाडं देतात त्यामुळे धनापेक्षा वन हे श्रे्ष्ठ आहे हे आता तुला अनुभवांती कळाले असेल… या एका उदाहरणाने धन मोठे की वन हा प्रश्न सोडवला… सर्व धर्मातही वृक्षाला पुजनीय स्थान देण्यात आले आहे… संतांनी ही "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " म्हणत वृक्षाशी, निसर्गाशी नातं जोडलं आहे…

माणसाला जगवणाऱ्या, पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या वृक्षांचा उत्सव सध्या राज्यात सुरु आहे तो ३३ कोटी वृक्षलागवडीतून… लोकांपर्यंत ज्या ज्या माध्यमातून पोहोचता येईल त्या सर्व माध्यमांचा उपयोग करून
वृक्षलागवडीसाठी त्यांना प्रोत्साहित केलं जात आहे.

राज्यात लागली ६ कोटीहून अधिक झाडं

राज्यात वनमहोत्सवांतर्गत "वृक्षोत्सव" सुरु आहे. १ जुलै पासून आतापर्यंत दहा दिवसात ६ कोटी १० लाख २८ हजार ८५१ झाडं राज्यात लागली. त्यात ११ लाख १० हजार ८११ लोकांनी सहभाग घेतला. हा वृक्ष जागर आता सप्टेंबर अखेरपर्यंत सुरु राहणार आहे.

वृक्षदिंडी झाली संवादाचे माध्यम

वृक्ष लागवडीचे बीज लोकांच्या मनात रुजवण्यासाठी, त्यांच्यात मिसळून थेट संवाद साधण्यासाठी वारी सारखे दुसरे व्यासपीठ नाही. एकाच वेळी लाखो वारकऱ्यांशी संवाद साधण्याची ही अनोखी संधी वन विभागाने साधली ती वृक्ष दिंडीच्या माध्यमातून.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत वन विभागाची वृक्षदिंडीही वारीत सहभागी झाली. "ज्ञानेश्वर, माऊली एकनाथ नामदेव तुकारामा"चा जयघोष करत पंढरीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत वन विभागाचे जवळपास ५० कर्मचारीही वारीत सहभागी झाले

पंढरीच्या वाटं नाही खडागोटं…

पंढरीच्या वाटं नाही खडागोटं… तिथं माझा सखा पांडुरंग" म्हणत पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांना वृक्ष आणि वृक्ष लागवडीचे महत्व या दिंडीतून सांगण्यात आले… वृक्ष विठ्ठल, वृक्ष पूजा विठ्ठल" चा संदेश त्यांच्या
मनात रुजवण्यात आला… कलापथके, चित्रफीती, कीर्तने, पथनाट्ये या सर्व माध्यमातून माणसाच्या आयुष्यातले वृक्षांचे महत्व सांगण्यात आले. वारीच्या मुक्कामी नामस्मरणाबरोबर होणाऱ्या भजनामध्ये वृक्षरंगही अनाहूतपणे मिसळला.. जिथे जिथे वारीचा मुक्काम आहे तिथे तिथे हरित वारीसाठी वारकऱ्यांच्या हाताने वृक्षलागवड करण्यात आली..

असा झाला वृक्षजागर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकारातून स्वच्छ वारी निर्मळ वारी, हरित वारी या हा उपक्रम राबविला गेला. वन विभागाने त्यांना २० हजार कडुनिंबाची रोपे पुरवली. भोर उप वन विभागाने वारी मार्गावर ३३ कोटी
वृक्षलागवडीचे बॅनर्स लावले, भिंतीही वृक्षलागवडीच्या संदेशाने बोलू लागल्या.. पालखी मार्गावर जेजुरी येथे रोप विक्री केंद्र सुरु करण्यात आले. वारकऱ्यांना जॅकेट, माहिती पत्रक आणि हरित पताकांचे वाटप करण्यात
आले…

सामाजिक वनीकरण विभागाकडून पालखी मार्गावर विविध वृक्षप्रजातींच्या बियांचे आणि रोपांचे वाटप करण्यात आले.. वारकऱ्यांना तुळशीची रोपे भेट देण्यात आली. शिर्सुफळ फाटयावर वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. इंदापुरला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करून वन विभागाने वारकऱ्यांना रोपांचे आणि बियांचे वाटप केले. इंदापूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी आणि प्रभातफेरी काढून वृक्षलागवडीविषयी जनजागृती केली.

सातारा जिल्ह्यातही वृक्षदिंडीने अनेक उपक्रम राबवत पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले. वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे हे ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात सपत्नीक सहभागी झाले. त्यांनी लोणंदहून पालखी
प्रस्थानाच्यावेळी लोणंद ते तरडगाव हा पायी प्रवास केला.. या मार्गावर रोप वाटप स्टॉलचेही त्यांनी उदघाटन केले. यावेळी वारकऱ्यांना तुळस, कडीपत्ता, बेल, या वृक्षप्रजातींची रोपे वाटण्यात आली, बियाण्यांच्या
पाकिटांचे, सीडबॉलचे वितरण करण्यात आले. वारीत हरित सेनेचे सदस्यही सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्ये सादर केली.

तुळशी उद्यान- पंढरपुरचे आणखी एक आकर्षण..

तुळस विठ्ठलाला खुप प्रिय… म्हणूनच वन विभागाने पंढरपुरात यमाई तलावाजवळ एक हेक्टर क्षेत्रात एक सुंदर तुळशी उद्यान साकारलं आहे. या उद्यानात ८ प्रकारच्या तुळशीच्या रोपांची लागवड करण्यात आली.. एकादशीच्या दिवशी येथे येणाऱ्या वारकऱ्याचेही रोपं देऊन स्वागत करण्यात येणार आहे. वाखरी पालखी
तळावरून विनामूल्य १० हजार रोपांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. येथेच महिला बचतगटातील सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण होईल. पंढरपूरच्या गोशाळा परिसरात शहीद सैनिक कुटुंबियांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल. सदगुरु बैठक पंढरपूर येथेही रोप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वारीत प्रामुख्याने शेतकरी असतात हे लक्षात घेऊन त्यांना फळझाड लागवडीसाठी शासन देत असलेलं अनुदान, कन्या वन समृद्धी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळझाड लागवड योजना अशा अनेक योजनांची माहिती देऊन फळझाड लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे

वारकऱ्यांना तुळशी उद्यान आणि तुळशींच्या प्रजातीची माहिती देणारी पुस्तिकाही या वारीदरम्यान वाटण्यात आली आहे..

एक लाखाहून अधिक प्रसाद रोपांचे वितरण

पंढरीला जाया अवंदा नव्हतं माझं मन… देवा विठ्ठलानं पत्र पाठवली दोन… असं म्हणत नियमाने पंढरीची वारी करणारे लाखो वारकरी भक्तगण आहेत. "जीवाचं सुखदु:ख तुला सांगतो वकिला, पंढरीच्या पाटला कधी भेटशी एकला" असं म्हणत त्यांनी त्या सावळ्या श्रीहरीच्या पायावर नतमस्तक होतांना कधी आपल्या व्यथा सांगितल्या तर कधी सुख. उद्या आषाढी एकादशी आहे. उन, वारा, पाऊस अंगावर झेलत विठ्ठल नामस्मरणात दंग होत ही पाऊल शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरीत पोहोचली आहेत.. यावेळी ते जेंव्हा परतीच्या प्रवासाला लागतील तेंव्हा वन विभागाने १ लाखांहून अधिक रोपांचे आणि बियाण्याच्या पाकिटाचे वितरण करण्याचे नियोजन केले आहे… त्यासाठी १०१ स्टॉल्सची उभारणी झाली आहे… विठ्ठल विठ्ठल जयहरीच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली असतांना वारीची आठवण म्हणून, पंढरीचा प्रसाद म्हणून ही रोपे राज्यभर लागावीत, हरित महाराष्ट्राची संकल्पना वेगाने पुर्णत्वाला जावी हा त्यामागचा हेतू आहे.. वृक्ष विठ्ठल… वृक्ष पुजा विठ्ठल असं म्हणत निघालेल्या वन विभागाच्या वृक्षदिंडीचे हेच तर खरं वैशिष्ट्य आहे… सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरणाची पेरणी… मनामनात… घराघरात…….

डॉ. सुरेखा मधुकर मुळे

drsurekha.mulay@gmail.com
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget