नागभूषण पुरस्कार गौरवमूर्तींकडून जगभरात नागपूरचा लौकिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( ३० जून २०१९ ) : अनेक क्षेत्रात नागपूर अग्रेसर असून नागपुरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. नागभूषण पुरस्काराने सन्मानीत विविध गौरवमूर्तीनी नागपूरचे नाव जगाच्यानकाशावर पोहचवत नागपूरच्या लौकिकात भर घातली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

चिटणवीस सेंटर येथे नागभूषण फाऊंडेशनच्यावतीने नागभूषण पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागभूषण पुरस्कार 2017 चे गौरवमूर्ती एअर मार्शल (नि.) शिरीष देव व 2018 चे पुरस्कार गौरवमूर्ती स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्यासह महापौर नंदा जिचकार, माजी खासदार अजय संचेती, अशोक गांधी, सतिश गोयल, विलास काळे, झामिन अमिन, निशांत गांधी व मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागभूषण पुरस्काराने एअर मार्शल (नि.) शिरीष देव आणि स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांचा गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, विविध क्षेत्रात नागपूरने आणि नागपूरच्या व्यक्तींनी आपला ठसा उमटविला आहे. विविध संदर्भात नागपूर आपले वैशिष्ट्य जपून आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागपुरातील व विदर्भातील व्यक्तींचा सन्मान करणे या संकल्पनेतून नागभूषण पुरस्कार आकाराला आला. नागभूषण पुरस्कार 2017 चे गौरवमूर्ती एअर मार्शल (नि.) शिरीष देव यांनी संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे, यासंदर्भात केलेले संशोधन व कार्य मोलाचे आहे. त्यांच्या देशसेवेचा हा यथोचित सन्मान असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नागभूषण पुरस्कार 2018 चे पुरस्कार गौरवमूर्ती स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्याबाबत गौरवोद्गार काढतांना मुख्यमंत्री म्हणाले, स्लम सॉकरच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात विजय बारसे यांनी नागपूरचे नाव जगात उंचावले आहे. युवकांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. बालकांत आणि युवकांमध्ये मोठी ऊर्जा असते. या ऊर्जेचा सकारात्मक पध्दतीने उपयोग झाला पाहिजे. यामुळे समाजाला आणि पर्यायाने देशाला लाभ होतो. खेळांमध्ये मोठी शक्ती असून खेळामुळे खिलाडू वृत्ती विकसित होते. मैदानी खेळांचे महत्त्व शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये रुजविण्याची आवश्यकता आहे. स्वयंप्रेरणेतून केलेल्या कामामुळेच अनेक मोठी कार्य उभी राहतात. स्लम सॉकरच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित घेत पुढे जाण्यामुळे युवाशक्तीला योग्य दिशा देण्याचे काम बारसे यांनी केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नागभूषण पुरस्काराने सन्मानीत एअर मार्शल (नि) शिरीष देव म्हणाले, विविध क्षेत्रात नागपूर अग्रेसर आहे. अनेक प्रतिभावंतांनी नागपूरची ओळख संबंधित क्षेत्रात निर्माण केली असल्याचे देव यांनी सांगितले.

नागभूषण पुरस्काराने सन्मानीत स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे म्हणाले, फुटबॉल हेच माझे जीवन असल्याने झोपडपट्टी फुटबॉल या संकल्पनेची सुरुवात झाली. तरुणाईमध्ये मोठी शक्ती असून या शक्तीला फक्त योग्य मार्गाला वळविण्याची आवश्यकता आहे. यासाठी फुटबॉल तसेच अन्य क्रीडा प्रकार नक्कीच उपयुक्त ठरतात. युवाशक्तीने खेळात झोकून दिल्याने ‘स्लम सॉकर’च्या अनेक खेळाडूंनी चमत्कार घडविला असल्याचे बारसे यांनी सांगितले.

विलास काळे म्हणाले, नागपूर त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने नागभूषण पुरस्काराची परंपरा सुरु झाली. यामध्ये युवा पुरस्काराचीही सुरुवात करण्यात आली आहे. कोणत्याही यशाच्या मागे केवळ भाग्यच नसते तर मोठी मेहनतही असते, असेही काळे यांनी नमूद केले. प्रास्ताविकात अजय संचेती यांनी नागभूषण पुरस्काराच्या संकल्पना व परंपरेबाबत माहिती विषद केली. सुत्रसंचालन श्रध्दा भारद्वाज यांनी केले तर आभार निशांत गांधी यांनी मानले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget