इयत्ता ९ वी १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण कायम

- शालेय शिक्षण मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई ( ८ ऑगस्ट २०१९) : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मापन करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून लेखी परिक्षेद्वारे ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे राहणार आहे. त्याचबरोबर ११वी व १२ वी साठी पर्यावरण शास्त्र या विषयामध्ये जलसुरक्षा हा विषय समाविष्ट करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

ते आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या परिषदेस शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव डॉ. सुवर्णा खरात उपस्थित होत्या.

शेलार म्हणाले, इयत्ता ९ वी ते इ. १२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुनर्विचार करण्याकरिता शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालानुसार इ.९ वी व इ. १० वी करिता या शासन निर्णयान्वये सन २०१९-२० पासून विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेनुसार भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेद्वारे मूल्यमापन 80 गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे राहणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

याचबरोबर शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इ.11 वी साठी व शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इ. 12 वी करिता अंतिम मूल्यमापन हे 650 ऐवजी ६०० गुणांचे राहील. सद्यस्थितीतील पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येणाऱ्या ५० गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. पर्यावरण शास्त्र या विषयामध्ये जल सुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी "जलसुरक्षा" हा विषय देशाच्या पातळीवर हाती घेतला असल्याने व याचे महत्व विचारात घेऊन जलसुरक्षा हा विषय अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आला असून इ. ९ वी ते इ. १२ वीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असल्याची माहितीही शेलार यांनी यावेळी दिली.

शेलार म्हणाले, लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ठ करण्यात येत आहे. इ. १० वीची अंतिम परीक्षा (राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी) ही केवळ इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये सीबीएसई प्रमाणे श्रवण व भाषण कौशल्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अन्य विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये गृहपाठ, बहुपर्यायी प्रश्न व उपक्रम याची तरतूद करण्यात आली आहे. अंतर्गत मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न करता पूर्ण वर्षभरात करण्याची मुभा राहील यासंदर्भातील नियोजन कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा स्तरावर करण्यात येईल. इ.११ वी ची वार्षिक परीक्षा इ.११ वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व इ.१२ वी वार्षिक परीक्षा इ.१२ वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील. सीबीएसई मंडळाच्या धर्तीवर लेखी परीक्षेत किमान २५ टक्के बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहितीही शेलार यांनी यावेळी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget