मनपा व बेस्ट कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी खातेस्तरावर नियोजनाचे आदेश


*प्रत्येक कर्मचाऱ्याला ३ संधी, त्यानंतर मोफत लसीकरणाच्या यादीतून नाव वगळणार*

*अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनात कोविड लसीकरण टास्क फोर्सची विशेष बैठक संपन्न*

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणा-या आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी अर्थात 'फ्रंटलाईन वर्कर्स' साठी कोविड लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेसह बेस्ट कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाच्या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व विभागांच्या व खात्यांच्या स्तरावर स्वतंत्रपणे नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या सर्व विभाग व खातेप्रमुखांना आज दिले आहेत. तसेच सर्व खाते प्रमुखांनी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आधी स्वतः लस घ्यावी व त्यानंतर आपल्या अखत्यारीतील इतर कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करावे, असेही श्री. काकाणी यांनी नमूद केले आहे.

..

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड लसीकरण विषय बाबींसाठी गठित 'टास्क फोर्स'ची विशेष बैठक आज संपन्न झाली. बैठकीला मार्गदर्शन करताना श्री. काकाणी यांनी सदर आदेश दिले आहेत. या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (आरोग्य) श्री. देवीदास क्षीरसागर, संचालक (आरोग्य शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. श्री. रमेश भारमल यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

..

बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी कोविड लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अनुषंगाने आयोजित आजच्या बैठकीदरम्यान चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे व संबंधित आदेश याबाबतचा संक्षिप्त तपशील पुढील प्रमाणे आहे:

१. महापालिकेच्या सर्व विभागांच्या / खात्यांच्या स्तरावर लसीकरण सुव्यवस्थित प्रकारे व्हावे, याकरिता समन्वय अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नेमणूक यापूर्वीच करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक विभाग / खात्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभाग / खात्यातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण योग्यप्रकारे व्हावे, यासाठी सुयोग्य नियोजन करावयाचे आहे.

२. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करताना शक्यतो कार्यालयाजवळील किंवा घराजवळील लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण करवून घेण्याची व्यवस्था समन्वय अधिकाऱ्यांनी करावयाची आहे.

३. समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्यातील कर्मचाऱ्यांचे सॉफ्टवेअरमध्ये नोंदविलेले भ्रमणध्वनी क्रमांक योग्य असल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक बदलले असतील, त्यांच्याबाबत सुधारित भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंद करवून घ्यावयाची आहे. जेणेकरून कर्मचारी लसीकरण केंद्रावर जाण्यापूर्वीच भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत असेल ज्यामुळे लसीकरण लवकर होण्यास मदत होईल.

४. कर्मचारी संख्या अधिक असलेल्या खात्यांसाठी स्वतंत्रपणे लसीकरण राबविले जाऊ शकते. यासाठी संबंधित खात्याच्या विभाग प्रमुखांनी व समन्वय अधिकाऱ्यांनी यथोचित समन्वय साधून कार्यवाही करावी.

५. महापालिकेच्या एखाद्या खात्यातील १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी एकाच वेळी लसीकरणास जाणार असतील, तर त्यासाठी महापालिकेद्वारे वाहन व्यवस्था करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक ते नियोजन खात्याच्या समन्वय अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे.

६. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मोफत लसीकरणाच्या ३ संधी मिळतील. सदर तीनही वेळेस कर्मचारी लसीकरण करण्यासाठी न गेल्यास त्याचे नाव मोफत लसीकरण याच्या यादीतून वगळण्यात येईल.

७. गर्भवती महिला, स्तनदा महिला यांना लसीकरणातून वगळण्यात आले आहे.

८. ज्या कर्मचा-यांना कोविड बाधा झाली होती किंवा झाली आहे, अशा कर्मचा-यांनी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दिनांकपासून १४ दिवसानंतर लसीकरण करवून घ्यावयाचे आहे.

९. सर्व कर्मचाऱ्यांनी पहिल्या लसीकरणानंतर २८ दिवसांनी दुसरे लसीकरण करावयाचे आहे.

१०. शक्य असल्यास खाते प्रमुखांनी लसीकरण करतानाचे आपले छायाचित्र आपल्या खात्याचा 'व्हाट्सअप ग्रुप' असल्यास त्यावर शेअर करावे. जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रेरणा मिळू शकेल.

===


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget