वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय १५ फेब्रुवारी २०२१ पासून होणार खुले


*कोविड-१९ विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अनिवार्य*

*विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, ५ वर्षांखालील मुले यांनी शक्यतो भेट देणे टाळावे*

मुंबई : भायखळा येथे स्थित, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सोमवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ पासून सर्वांसाठी खुले होत आहे. निरनिराळे प्राणी, पक्षी पाहण्यासाठी बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेले हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आकर्षणाचे ठिकाण आहे. प्राणिसंग्रहालयात येणाऱया नागरिकांनी वावरताना कोविड १९ विषाणू संसर्ग प्रतिबंध विषयक सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्‍यावी, असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा संसर्ग मुंबई महानगरात पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी वेगवेगळ्या नागरी सेवा-सुविधा पुरवताना अद्यापही खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण या विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. टाळेबंदीच्या कालावधीमध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते, जेणेकरुन विषाणूचा संसर्ग फैलावणार नाही. कोविड संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर प्राणिसंग्रहालय पुनश्च जनतेसाठी खुले करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यासोबत कोविड-१९ विषयक नियमावलीचे पालन करणे देखील अनिवार्य केले आहे. 


ही नियमावली पुढीलप्रमाणे आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य असेल.

वाहनधारकांनी प्रवेशद्वाराजवळ वाहनांची चाके निर्जंतुकीकरण फवारणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव / संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि ५ वर्षांखालील लहान मुलांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्‍यावी.

विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे. गर्दी करू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.

प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत कमी वस्तू/साहित्य आणावे. विषाणू संसर्ग टाळण्यासाठी वस्तू/साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. 

प्रवेशद्वाराजवळ हात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) करूनच उद्यानात प्रवेश करावा.

प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने / समूहाने फिरू नये.

प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये. 

कोरोना विषाणू प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.

प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये. कचराकुंडीचा वापर करावा. कोठेही थुंकू नये. 

एकवेळ वापराचे (सिंगल यूज) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱयाच्या डब्यात टाकावे.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्राणिसंग्रहालयात जवळपासच्या सुरक्षारक्षकांशी संपर्क साधावा.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात कोणतेही खाद्यपदार्थ आणू नये.

एकवेळ वापराच्या बॉटल (सिंगल यूज प्लास्टिक बॉटल) प्राणिसंग्रहालयात आणू नयेत. त्याऐवजी प्रमाणित अथवा धातूच्या बाटल्या आणाव्यात. जेणेकरून कचरा टाळता येईल.

प्रसाधनगृहाचा उपयोग केल्यानंतर तेथे साबण द्रावण (लिक्वीड सोप) ने हात स्वच्छ धुवावेत.

पिण्याच्या पाण्याची सुविधा प्राणिसंग्रहालयात करण्यात आली आहे. तेथे पाणी पिण्याआधी हात निर्जंतुकीकरण (सॅनिटाईझ) करून घ्यावेत.

मुख्य प्रवेशद्वाराजवळील पाणपक्षांची प्रदर्शनी विशेष काळजी म्हणून तात्पुरती बंद असेल.


वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात येणाऱया सर्व पर्यटकांनी या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल. त्याचे योग्य पालन करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

*****


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget