खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्यास मुभा


*‘24 x 7’ केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तिंच्या लसीकरणाचे लक्ष्य

*महानगरपालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आढावा व नियोजन बैठक संपन्न

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ‘कोविड – १९’ लसीकरण विषयक समन्वयनात्मक कार्यवाही व अंमलबजावणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर सुयोग्यप्रकारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने तसेच लसीकरण वाढविण्याबाबत महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज एका विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी देखील मार्गदर्शन केले. तर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, महापालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी,  अति मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

..

या बैठकी दरम्यान सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरण संख्या सुनियोजित पद्धतीने वाढविणे, याबाबत आवश्यक ते सर्व व्यवस्थापन सुयोग्यप्रकारे करणे आणि कोविड लसीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे व संबंधित आदेश पुढीलप्रमाणेः-


१. वय-वर्षे ६० पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तिंचे लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ०९ मार्च, २०२१ पर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तिंचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वय-वर्षे ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंचेही लसीकरण करण्यात येत असून, या गटातील १५ हजार २७२ व्यक्तिंचे लसीकरण दिनांक ०९ मार्च, २०२१ पर्यंत करण्यात आले आहे.


२. वरील *दोन्ही वयोगटातील व्यक्तिंचे लसीकरण करण्यासाठी १ जानेवारी, २०२२ रोजीचे वय लक्षात घ्यावयाचे आहे. यानुसार आज ज्यांचे वय ५९ वर्षे ३ महिने किंवा सहव्याधी असणा-या गटातील व्यक्तिचे वय ४४ वर्षे ३ महिने असले, तरी देखील त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे,* ही बाब महानगरपालिका आयुक्त महोदयांनी आजच्या बैठकी दरम्यान आवर्जून नमूद केली.

..

३. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मुंबईमधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास (24 x 7) लसीकरण सुरु ठेवण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यानुसार केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्याची विनंती महापालिकेने केंद्र शासनाकडे केली आहे. याबाबत देखील आजच्या बैठकी दरम्यान चर्चा झाली. केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार मुंबईतील रुग्णालयांनी आठवड्याचे सातही दिवस २४ तास सुरु राहणारी लसीकरण केंद्रे सुरु करावीत, असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान केले. तर अनेक खासगी रुग्णालयांनी २४ तास कार्यरत राहणारे लसीकरण केंद्र सुरु करण्यात स्वारस्य दाखविले.    

..

४. वरीलनुसार २४ तास कार्यरत राहणारी लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण संख्या सुनियोजित पद्धतीने वाढविण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेता, अशा प्रकारची लसीकरण केंद्रे सुरु झाल्यानंतर दररोज १ लाख व्यक्तिंचे लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचा मानस महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान नमूद केला. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही सुमारे ३० लाख आहे, ही बाब लक्षात घेतल्यास व दिवसाला १ लाख व्यक्तिंचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिन्याभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल. कोविडचा धोका ज्येष्ठ नागरिकांना अधिक असतो, त्यामुळे अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत असल्याचेही महापालिका आयुक्तांनी नमूद केले.

..

५. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सध्या सुरु असणारी लसीकरण केंद्रे ही ८ तास ते १२ तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. या लसीकरण केंद्रांद्वारे दिनांक ०९ मार्च, २०२१ रोजी ३८ हजार २६६ व्यक्तिंचे लसीकरण करण्यात आले. ही लसीकरण केंद्रे २४ तास कार्यरत झाल्यास दिवसाला १ लाख व्यक्तिंचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान व्यक्त केला. त्याचबरोबर आणखी २९ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

..

६. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्तिंचे लसीकरण करण्यापूर्वी त्यांची नोंदणी ही संबंधित भ्रमणध्वनी ऍपवर, अर्थात कोविन ऍपवर होणे गरजेचे आहे. तसेच यासाठी रुग्णालयांमध्ये जाऊन थेट नोंदणीचा पर्याय देखील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. रुग्णालयांच्या स्तरावर संबंधित संकेतस्थळाद्वारे नोंदणी करण्यात अडचणी असल्याची बाब काही खासगी रुग्णालयांद्वारे आजच्या बैठकी दरम्यान मांडण्यात आली. *याबाबत महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी व माहिती तंत्रज्ञान खात्यातील अधिकारी यांचा समावेश असलेली चमू तात्काळ गठीत करण्याचे व सदर चमू दिनांक ११ मार्च, २०२१ पासून महापालिकेच्या ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकाशी संलग्न करण्याचे आदेश दिले. जेणेकरुन रुग्णालयांच्या स्तरावर थेट नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास सदर दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अडचणीचे निवारण करता येऊ शकेल.*

..

७. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास यापूर्वीच केंद्र शासनाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. परंतु, ज्यांनी अद्यापही लसीकरण केंद्र सुरु केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी माहितीही आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आली.    

..

८. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांची संख्या सध्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज असून संभाव्य गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर आवश्यक ते सर्व नियोजन सुव्यवस्थित प्रकारे करण्यात आले आहे. हे नियोजन करताना रुग्णालये, आय. सी. यू. खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार विषयक सामुग्री इत्यादी सर्व संबंधित बाबींचेही सूक्ष्मस्तरीय नियोजन देखील यापूर्वीच करण्यात आले आहे.

===



Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget